पुणे : वकिली आणि सामाजिक क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून अविरतपणे कार्यरत असलेले राज्यातील ज्येष्ठ विधिज्ञ भास्करराव आव्हाड (वय 77) यांचे आज शुक्रवारी सकाळी निधन झाले. त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या पश्चात मुलगा ऍड. अविनाश आव्हाड, मुलगी, पत्नी असा परिवार आहे.
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवासह विविध वकिल संघटनांचे त्यांनी अध्यक्षपद भूषवले होते. तसेच ते विद्यार्थीप्रिय शिक्षक होते. राज्यातील विविध सामाजिक संस्थांच्या कमिटीवर देखील त्यांचा समावेश होता. वकिलीची प्रॅक्टिस करत असताना त्यांनी अनेक तरुण वकील घडवले आहेत. बदलते कायदे व वकिली आणि न्यायालयीन व्यवस्थेबाबत त्यांनी राज्यभरात शेकडो व्याख्याने दिली आहेत. भास्करराव आव्हाड यांचे बंधू सुधाकरराव आव्हाड देखील ज्येष्ठ विधिज्ञ म्हणून परिचित आहेत.
* विधिज्ञ आव्हाड यांचा अल्प परिचय
विधिज्ञ भास्करराव आव्हाड यांनी लॉकडाऊनच्या काळात देखील कायद्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे काम केले. विविध वृत्तपत्रे, मासिके, दिवाळीअंक यातून लेखन करून समाजात कायद्याविषयी जनजागृती व्हावे यासाठी त्यांनी लिहिलेले लेख वाचनीय आहेत. नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील एका खेड्यात जन्म झालेल्या आव्हाड यांना महाराष्ट्रातील विविध सामाजिक संस्थानी अनेक पुरस्काराने गौरवले होते. त्यांच्या निधनामुळे वकिली क्षेत्रातील माहितीचा भांडार आणि चांगले मार्गदर्शक हरपल्याची भावना वकील व्यक्त करत आहेत.