सांगली : शिराळा तालुक्यातील रेड येथे बसस्थानकावर कापडामध्ये गुंडाळलेल्या दोन तलवारीसह एकास शिराळा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नागपंचमी व शिराळ्यातील लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
तानाजी किसन तांदळे (वय 30 रा. रेड, ता.शिराळा) असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे. शिराळा पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार रेड (ता. शिराळा ) येथील बसस्थानकावर तानाजी तांदळे हा कापडात गुंडाळलेल्या दोन तलवारी घेऊन फिरत होता. माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक विशाल पाटील व सहकाऱ्यांनी तानाजी तांदळे यास ताब्यात घेतले आहे. त्याचे जवळ कापडात गुंडाळलेल्या दोन तलवारी मिळून आल्या आहेत.
नागपंचमी आणि लॉकडाऊनच्या कालावधीत हा प्रकार घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. यात शिराळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
ही कामगिरी पोलीस हवालदार कालिदास गावडे, नितीन यादव, अरुण कानडे, रणजीत टोमके, तुशार जाधव यांनी केली.