रत्नागिरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभराता लॉकडाऊन जाहीर केले. सर्व जनता घरातच लॉक झाली. कोरोना प्रादुर्भाव होऊ नये म्हणून खबरदारी घेत आपआपल्या परीने घरातच जीवनाच्या आनंद घेऊ लागले. पण असे काही ग्रामस्थ आहेत की ज्यांनी या लॉकडाउनबरोबर जगत ‘लॉकडाऊन’ नावाची विहीर खोदून लॉकडाऊनच नाव चिरंतन करून ठेवले. त्यात रत्नागिरी तालुक्यातील वेळवंड ग्रामस्थांचे काम कौतुकास्पद आहे.
लॉकडाऊन जाहीर झाले. पण वेळ जात नव्हता म्हणून अनेकांनी वेगवेगळे टाईमपास करणारे खेळ सुरू केले. मात्र त्याला अपवाद ठरली ती वेळवंड भायजेवाडीतील 10 घरांची भायजे भावकी. वाढती कुटुंब संख्या दिवसेंदिवस पाण्याची वाढणारी गरज लक्षात घेऊन विहीर खोदण्याचा फक्त निर्णयच नाही तर प्रत्यक्ष तीन महिन्यांच्या कालावधीत 40 फूट विहीर खोदत इतिहास निर्माण केला आणि लॉकडाऊनच्या दुःखद आठवणींना ही सुखद करत कायमच्या स्मरणात राहतील, असे काम केले.
महादेव गोपाळ भायजे यांनी आपल्या कुटुंबाच्या वाट्याला आलेल्या जमिनीत विहीर खोदण्यासाठी जागा दिली. दगडातून पाणी काढणे म्हणजे रक्ताचे पाणी करण्यासारखे आहे. तरुण मुलांना विहीर खोदण्याचा अनुभव नव्हता. काही तरुण मुंबईतून आलेले तर काही रंगकाम, बांधकाम करणारे होते पण जुन्या-जाणत्या लोकांच्या मार्गदर्शनखाली सतत तीन महिने मेहनत व चिकाटीच्या जोरावर कायमस्वरूपी पाण्याची समस्येवर उपाय शोधला. पाणी पण खूप लागल्याने सर्वच ग्रामस्थ खुश आहेत.
* आता शासनाकडे केली ‘ही’ मागणी
ही विहीर खोदण्याच्या कामात महिलांचा ही वाटा खूप मोठा असल्याचे ग्रामस्थ तुकाराम भायजे यांनी सांगितले. नारायण भायजे, गणपत भायजे यांच्यासारख्या अनुभवी लोकांच्या मार्गदर्शन व सहकार्य यामुळे लॉकडाऊनचा खरा उपयोग करता आला असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यावर जि प सदस्य परशुराम कदम व पंचायत समिती सदस्य साक्षी रावणंग, सरपंच संतोष गुरव, उपसरपंच मनीष मोहिते यांच्या उपस्थितीत पूजन करण्यात आले. विहीर खोदून झाली पण विहिरीतील पाणी घरापर्यंत पोचवण्यासाठी शासनाने सहकार्य करावे, अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.