मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपाला सरकार पाडण्याचे आव्हान दिले. या आव्हानानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘तुम्ही इतर वृत्तवाहिनीला मुलाखत देऊन दाखवा’ असा पलटवार केला आहे. तसेच, राज्यात दोन मुख्यमंत्री आहे, असा टोलाही त्यांनी शरद पवारांचे नाव न घेता लगावला आहे.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवरही सडकून टीका केली. ‘चार महिन्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सामनाला मुलाखत दिली आहे. त्यामुळे मॅच फिक्सिंग हे इथे आलेच. कोरोनाच्या परिस्थितीनंतर उद्धव ठाकरे हे माध्यमांसमोर आले आहेत. मुळात संजय राऊत हे ठाकरेंचे स्तुतीपाठक आहे. त्यामुळे हिंमत असेल तर उद्धव ठाकरे यांनी इतर माध्यमांना मुलाखत द्यावी’, असे थेट आव्हानच पाटील यांनी दिले.
(तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल‘ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि टेलिग्रामवरही उपलब्ध)
राज्यातील शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार पाडून दाखवा, असे म्हणत या सरकारचे भवितव्य विरोधी पक्षनेत्यांवर अवलंबून नाही, अशा स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपाला सुनावले. शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीच्या दुसऱ्या भागातच, सरकार पाडून दाखवा, असे आव्हान मुख्यमंत्र्यांनी भाजपा नेत्यांना केले होते. त्यानंतर, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
* मी काय फेविकॉल लावून बसलेलो नाहीय
भाजपा नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अलिकडेच राज्यातील सरकार पाडण्याची गरज नाही ते अंतर्विरोधाने पडेल, असे भाकीत केले होते. यासंदर्भात संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारला. दिल्लीत जाऊन एक घोषणा मात्र त्यांनी नक्की केली, ती म्हणजे हे सरकार पाडण्याचा आपला इरादा नाही. हे त्यांनी महाराष्ट्र सदनामध्ये येऊन सांगितले. हे किती दिलासादायक आहे तुम्हाला? असा सवाल संजय राऊत यांनी केला. त्यावर “मी तर इथे बसलेलोच आहे. त्यांचा इरादा असेल, नसेल…काही जण सांगतात की, ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये सरकार पाडणार. माझं म्हणणं, वाट कसली बघताय आता पाडा. माझी मुलाखत चालू असताना सरकार पाडा. मी काय फेविकॉल लावून बसलेलो नाहीय. पाडायंच तर पाडा, जरूर पाडा”, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपाला सुनावले.
* अजित पवारांना फेल ठरवण्याचा प्रयत्न
पुण्यातील कोरोनाच्या परिस्थितीवरून चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर टीका केली. त्यांचा रोख मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर होता. ‘पुण्यात अजित पवार कसे फेल ठरले आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी पुण्याबद्दल एकही बैठक घेतली नाही. त्यांना पुण्याची किती काळजी आहे? त्यांनी सगळं अजित पवारांवर सोडून दिलं आहे, अशा शब्दांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. सरकारनं पुणे महानगरपालिकेला काहीही दिलेलं नाही, असंदेखील चंद्रकांत पाटील यांनी गंभीर आरोप केले.