अमरावती : कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 24 वर्षीय तरुणीच्या गुप्तांगातील स्वॅब घेतल्याचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार अमरावतीमध्ये घडला आहे. बडनेरा पोलिसांनी मंगळवारी (28 जुलै) रात्री कोविड लॅबमध्ये टेक्निशिअन म्हणून काम करणाऱ्या अल्पेश अशोक देशमुख (वय 30 वर्षे) नावाच्या आरोपीला अटक केली आहे. त्याच्यावर बलात्कार, अॅट्रॉसिटी, आयटी कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित तरुणी अमरावतीमध्ये भावाकडे राहत असून एका मॉलमध्ये नोकरी करते. मॉलमधील कर्मचाऱ्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे 28 जुलै रोजी ट्रामा केअर टेस्टिंग लॅबमध्ये त्याच्या संपर्कातील 20 जणांचे स्वॅब घेण्यात आले. मात्र स्वॅब घेणाऱ्या अल्पेश देशमुखने तक्रारदार तरुणीला परत बोलावलं आणि “तुमची चाचणी पॉझिटिव्ह आली असून युरिनल तपासणी करावी लागेल,” असं सांगितले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
ही बाब तरुणीने वरिष्ठ महिला सहकाऱ्याला कळवली. त्या दोघींनी महिला टेक्निशिअन नाही का, अशी विचारणा केली. त्यावर अल्पेश देशमुखने महिला टेक्निशिअन नसल्याचे सांगितले. तसंच तपासणीसाठी तुम्ही एका महिलेला सोबत घेऊ शकता, असंही म्हटलं. त्यानंतर टेक्निशियनने फिर्यादी तरुणीच्या गुप्तांगातील स्वॅबचे नमुने तपासणीसाठी घेतले. इतकंच नाहीतर तुमची चाचणी निगेटिव्ह असल्याचंही सांगितलं.
योनीद्वारे घेतलेल्या स्वॅब तपासणीबाबत तरुणीला शंका आली आणि तिने ही बाब भावाला सांगितली. त्याने डॉक्टरांना विचारल्यावर त्यांनी अशाप्रकारे कोरोनाची चाचणी करत नसल्याचं सांगितलं. यानंतर तरुणीच्या तक्रारीवरुन अल्पेश देशमुख याच्याविरोधात बडनेरा पोलिसांनी विविध कलमांसह गुन्ह्याची नोंद केली.
“ही अतिशय धक्कादायक बातमी आहे. ज्याने हा स्वॅब घेतला त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. ही एक प्रकारची विकृती आहे. अशा विकृतींना ठेचावं लागेल. मुलींना अशावेळी सक्षम करावं लागेल. ती मुलगी बोलली म्हणून हे प्रकरण बाहेर आलं. अशा गोष्टींना आळा घालण्यासाठी कडक शिक्षा व्हावी,”
यशोमती ठाकूर, महिला बालविकास मंत्री
तो कॉन्ट्रॅक्ट बेसवर हा मुलगा काम करतो. त्या लोकांची मानसिक स्थिती पाहूनच नियुक्ती करावी. ती महिला शिक्षित असल्याने तिने तक्रार केली. त्याला कडक शिक्षा व्हायला पाहिजे. महिला म्हणून आपली जबाबदारी आहे की, आपण अशा गोष्टींची तक्रार केली पाहिजे. मी याबाबत जिल्हाधिकारी आणि पोलिसांना बोलणार आहे. आरोपीवर कडक कारवाई व्हावी यासाठी मी प्रयत्न करणार आहे,” असं अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी सांगितले.
“कोरोनाच्या चाचणीसाठी अशाप्रकारे स्वॅब घेतला जात नाही. हा अत्याचार आहे. याप्रकरणी लॅब टेक्निशियनविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे ”
शैलेश नवल – जिल्हाधिकारी, अमरावती