कन्याकुमारी : नागरकोईलमधील माजी आमदाराने एका १२ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला होता. त्याच्या शोधासाठी पाच विशेष पथके नेमण्यात आली होती. अखेर ए. मुरुगेशन (वय ५३) या आरोपीला अटक करण्यात आली आहे.
१२ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी मुरुगेशनवर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर तो फरारी झाला होता. तिरुनेलवेली जिल्ह्यातील उवारी आणि थिसायनविलाई गावांमध्ये तो लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर बुधवारी दुपारी पोलिसांच्या पाच विशेष पथकांनी शोधमोहीम सुरू केली होती. ही घटना उघडकीस आल्यानंतर मुरुगेशनला सोमवारी एआयएडीएमकेमधून बडतर्फ करण्यात आले होते. या प्रकरणात त्याच्यासह इतर चार जणांवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कन्याकुमारी येथील महिला पोलीस ठाण्यात त्याची चौकशी करण्यात आली. बुधवारी संध्याकाळी कन्याकुमारी येथील मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार झाला होता. इतर जिल्ह्यांत जाण्यासाठी ई-पास अनिवार्य असताना, तो जिल्ह्याच्या सीमेबाहेर गेलाच कसा, असा प्रश्न पडला असून, पोलीस याची चौकशी करत आहेत.