माढा : स्वतःच्या मालकीच्या गाळेविक्रीच्या कारणावरून अंजनगाव उमाटे (ता. माढा )येथील रमेश विठ्ठल माळी (वय 50) यांचा स्वतःच्या मुलाने गळा व तोंड दाबून खून केल्याने गणेश विठ्ठल माळी (वय 23 ) याच्यावर माढा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबतची फिर्याद मयताची पत्नी अंजना रमेश माळी (वय 45) यांनी माढा पोलिसात दिली आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की. अंजनगाव उमाटे येथील मुख्य चौकात रमेश माळी यांची जागा असून याठिकाणी त्यांचे गाळे आहेत. याच गाळ्याच्या विक्रीच्या कारणावरून मयताचे व आरोपी मुलाचे भांडण होत होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दरम्यान गाळे विकण्यावर ठाम असलेल्या मयत रमेश यांच्यावर चिडून आरोपी गणेश याने मानेवर बुक्कीने मारहाण करून तो खाली पडल्यानंतर त्याचा गळा व तोंड दाबून जीवे ठार मारले आहे.
ही घटना आज शुक्रवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास घडली आहे. दरम्यान आरोपीस माढा पोलीसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल कादबाने हे करीत आहेत.
दरम्यान स्वतःच्या मुलाने जन्मदात्या पित्याचा खुन केल्याच्या शेवरेनंतरच्या तालुक्यातील या दुसऱ्या घटनेने तालुक्यातील वातावरण गढूळ बनत चालल्याचे दिसून येत आहे.