नवी दिल्ली : मोदी सरकारनं नवं शैक्षणिक धोरण मंजूर केलं. तब्बल ३४ वर्षांनी देशात नवं शैक्षणिक धोरण लागू होणार आहे. याबद्दल सध्या संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. काँग्रेस नेत्या आणि अभिनेत्री खुशबू सुंदर यांनी नव्या शैक्षणिक धोरणाचं स्वागत केलं आहे. पक्षाच्या भूमिकेपेक्षा वेगळं मतं मांडल्याबद्दल त्यांनी ट्विट करून काँग्रेसचे खासदार राहुल गांधींची माफीदेखील मागितली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
नव्या शैक्षणिक धोरणाबद्दल माझी भूमिका पक्षापेक्षा वेगळी आहे. त्यासाठी मी राहुल गांधींची माफी मागते. मात्र मी कटपुतली किंवा रोबोटप्रमाणे मान न डोलावता तथ्यांवर भाष्य करते. प्रत्येक मुद्द्यावर आम्ही आमच्या नेत्याशी सहमत असू शकत नाही. मात्र नागरिक म्हणून आपलं मत व्यक्त करू शकतो, असं सुंदर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
राजकारण केवळ गोंधळ घालण्यासाठी नाही. राजकारणात एकत्र येऊनही काम करायला हवं, असं मत सुंदर यांनी त्यांच्या दुसऱ्या ट्विटमधून व्यक्त केलं आहे. ‘राजकारण म्हणजे निव्वळ गोंधळ नव्हे, ही गोष्ट भाजपा आणि पंतप्रधान कार्यालयानं समजून घ्यायला हवी. विरोधी पक्ष म्हणून आम्ही याकडे बारकाईनं लक्ष घालू आणि त्यातल्या त्रुटी दाखवू. सरकारनं नव्या शैक्षणिक धोरणेबद्दलच्या त्रुटींवरून प्रत्येकाला विश्वासात घ्यायला हवं,’ असं सुंदर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
* भाजपमध्ये जाणार नाही
नव्या शैक्षणिक धोरणाचं स्वागत करणाऱ्या सुंदर यांनी आपण भाजपामध्ये जाणार नसल्याचं पुढील ट्विटमध्ये स्पष्ट केलं आहे. ‘संघाशी संबंधित मंडळी रिलॅक्स राहू शकतात. पण त्यांनी आनंदीत होऊ नये. मी भाजपात जाणार नाही. माझं मत पक्षापेक्षा वेगळं असू शकतं. कारण मी स्वतंत्र मतं असणारी व्यक्ती आहे. नव्या शैक्षणिक धोरणात त्रुटी आहेत. पण आम्ही सकारात्मकपणे बदलांकडे पाहू शकतो,’ असं सुंदर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.