सोलापूर : मित्र कधी काय करतील हे सांगता येत नाही. असाच एक प्रत्यय सोलापूर जिल्ह्यात आला आहे. नोकरी लागली म्हणून मित्रांनी चक्क बॅनर लावून अभिनंदन केले आहे. बॅनरवर पगाराचा उल्लेखही केला आहे. अनेक वर्ष नोकरीसाठी धडपडत असलेल्या जिवलग मित्राला नोकरी लागल्याने मित्रांनी अभिनंदन केले आहे. सध्या या बॅनरची सोशल मीडियावर मोठी चर्चा आहे. हा बॅनर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन जाहीर झाला. देशातील अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. शहरात राहणारी मुलं गावाकडे परतली. अनेकांना नोकरी नाही. अशातच माढा तालुक्यातील दारफळ (सिना) गावातील विशाल बारबोले या तरुणाला साखर कारखान्यात चांगल्या हुद्यावर पाच आकडी पगारी नोकरी मिळाल्याने गावातील मित्र परिवाराने मुख्य चौकात मोठा फलक लावून आनंद साजरा केला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
एमपीएससी युपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होऊन नोकरी मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन असे बॅनर झळकावून केले जाते. मात्र, साखर कारखान्यात 14,500 रुपये प्रतिमाहची नोकरी लागल्यामुळे मित्र परिवाराने बॅनरबाजी करुन कौतुक व अभिनंदन केल्याची घटना केवळ सोलापूरातच घडू शकते, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
माढा तालुक्यातील दारफळ गावचा रहिवासी असलेल्या विशालने दहावी उतीर्ण होऊन आयटीआयचा कोर्स पूर्ण केला होता. पिंपरी येथील बबनराव शिंदे शुगर्स येथे विशाल कर्मचारी नोकरीस लागला. अनेक वर्ष काम देखील केले. मात्र, तिथे मिळणाऱ्या पगारावर तो समाधानी नव्हता. तो मोठा पगार आणि हुद्याच्या तो शोधात असायचा.
अशातच मोहोळ तालुक्यातील आष्टी येथे असलेल्या औदुंबरराव पाटील साखर कारखान्यात कर्मचारी भरती निघाली आणि विशाल तिथे गेला. क्रेन ऑपरेटर पदी निवड झाली. अनेक धडपडत असलेल्या आपल्या जिवलग मित्राला नोकरी लागल्याचे समजताच मित्र परिवाराने त्याचा गावातील मुख्य चौकात पगाराची रक्कम लिहून अभिनंदनाचा मोठा फलक लावला.
* ऊस उत्पादक शेतक-यांचा थाटच निराळा
राज्यातील सर्वाधिक साखर कारखान्यांचा जिल्हा म्हणून सोलापूरची महाराष्ट्रात ओळख आहे. सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांची मोठी उलाढाल सोलापूर जिल्ह्यात होते. त्यामुळे, साखर सम्राटांच्या या जिल्ह्याची महाराष्ट्राला गोडी आहे. उजनी धरणाचं वरदान लाभलेल्या सोलापूरमधील कुर्डूवाडी तालुक्यातही जवळपास 3-4 साखर कारखाने आहेत. येथील राजकीय मंडळींचं साखर उद्योगावर चांगलंच प्रभुत्व आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी आणि येथील नागरिकांचा थाटच वेगळा असतो. सोलापूर जिल्ह्यातील एका युवकास साखर कारखान्यात नोकरी लागल्यानंतर तेथील तरुणांनी चक्क बॅनरबाजी करत अभिनंदन केलंय.