सोलापूर : महाराष्ट्र राज्यातील मंदिरे उघडावीत, अशी मागणी करणार्या वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या पंढरपुरातील आंदोलनाची राज्य सरकारने दखल घेतल होती. त्यानुसार ही मंदिरे लवकरच उघडण्यात येतील, असे आश्वासनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. मात्र, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने आंदोलनाच्या दुसर्याच दिवशी मंदिर 30 सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रकाश आंबेडकर यांच्यासह 15 जणांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले. मंदिरात जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले. राज्य सरकारने आपल्यासह 15 जणांना मंदिरामध्ये जाण्याची आणि विठ्ठलाचे दर्शन घेण्याची परवानगी दिली आहे. महाराष्ट्र राज्यातील प्रार्थनास्थळे सुरू करण्यासाठी राज्य सरकारने 10 दिवसांची मुदत मागितलीय. या दिवसांत सरकारकडून नियमावली जारी केली जाणार आहे, असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले आहे, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
10 दिवसांत नियमावली तयार झाली नाही, तर आम्ही पुन्हा पंढरपुरामध्ये आल्यावाचून राहणार नाही, असा इशारा देखील वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिलाय. मात्र, काल मंगळवारी मंदिर समितीने 30 सप्टेंबरपर्यंत मंदिर न उघडण्याचा निर्णय घेतलाय.
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रकोपामुळे हा निर्णय घेतला आहे, असे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने सांगितले आहे. याबाबत विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने प्रसिद्धीपत्रक काढून याची माहिती दिलीय. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यात अधिक प्रमाणावर रुग्णसंख्या वाढत आहे. यामुळे खबरदारीच्या उपाययोजना म्हणून भाविकांच्या सुरक्षेसाठी मंदिर 17 मार्च ते 31 ऑगस्ट पर्यंत बंद ठेवले होते.
राज्य सरकारने देखील जारी केलेल्या लॉकडाऊनच्या नोटिसीमध्ये राज्यातील मंदिरे 31 सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार विठ्ठल रुक्मिणी मंदिर 30 सप्टेंबरपर्यंत भाविकांसाठी बंद राहणार आहे, असेही विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने म्हटले आहे. या दरम्यानचे सण, उत्सव परंपरेनुसार साधेपणाने साजरे केले जाणार आहेत, असेही विठ्ठल रुक्मिणी समितीने म्हंटले आहे.