लातूर : मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाली आहे. त्यामुळे संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मराठा आरक्षण कायम ठेवावे या करीता खासदारांनी बाजू मांडावी या करीता मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला आहे. यातूनच आता खासदार, आमदार, पालकमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. तर मंगळवारी आणि गुरुवारी खासदार, पालकमंत्र्यांच्या घरासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे
या संदर्भात मराठा समाजाची रविवारी (ता.१३) येथे बैठक झाली. ही स्थगिती उठवण्यासाठी व आरक्षण पूर्ववत करण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार या दोघांनी मिळून प्रयत्न करण्याची गरज आहे. राज्यातील सर्व खासदारांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाची बाजू मांडावी व त्या ठिकाणी प्रस्ताव मंजूर करून घ्यावा.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
राज्य सरकारने देखील केंद्र सरकारला आरक्षणासाठी पाठपुरावा करावा व स्थगिती लवकर उठवावी या करीता मंगळवारी १५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता खासदार सुधाकर शृंगारे यांच्या घरासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. १७ सप्टेंबर रोजी बाभळगाव येथे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या तसेच लातूर ग्रामीण, निलंगा, औसा, अहमदपूर, उदगीर येथील आमदारांच्या घरासमोर निदर्शन करून आंदोलन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. या बैठकीला तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.