पुणे : भाजपचे ज्येष्ठ नेते वसंतराव वाणी यांचे निधन झाले. वयाच्या 76 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वसंतराव वाणींना श्रद्धांजली अर्पण केली. पिंपरी चिंचवड नवनगर पालिकेचे पहिले नगरसेवक म्हणून निवडून येऊन त्यांनी राजकीय कारकीर्दीस सुरुवात केली. प्राधिकरण सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले होते.
राष्ट्रवादीचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपच्या राज्य कार्यकारिणीचे ते सदस्य होते. प्रमोद महाजन, नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडे अशा ज्येष्ठ नेत्यांचे ते निकटवर्तीय मानले जात. आणीबाणीच्या काळात त्यांनी तुरुंगवासही भोगला. पिंपरी चिंचवडमध्ये भाजप उभारणीत वसंतराव वाणी यांनी मोलाची कामगिरी बजावली होती. एक धडाडीचा संघटक म्हणून पिंपरी चिंचवड शहराला त्यांची ओळख होती.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
वसंतराव वाणी हे काही काळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. मतभेद झाल्याने त्यांनी भाजपला सोडून राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरला होता. पक्षाचे प्रदेश समन्वयक म्हणून त्यांनी काम केले होते. मात्र त्यानंतर त्यांनी पुन्हा भाजपमध्ये घरवापसी केली.“ज्येष्ठ नेते आणि पिंपरी चिंचवडचे माजी नगरसेवक वसंतराव वाणी यांचे निधन झाल्याचे समजून दुःख झाले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो” असे ट्वीट अजित पवार यांनी केले आहे.
वसंतराव वाणी यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. वाणी हे मूळ जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील कुंजर येथील रहिवासी आहेत.