सांगली : कोरोना बाधित रूग्णांना वेळेत ऑक्सिजन व औषधोपचार मिळणे आवश्यक आहे. यासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी बेड्सची संख्या वाढविण्यात येत आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून सांगलीत मुस्लिम समाजाच्या वतीने लोकवर्गणी गोळा करून 100 बेडचे हकीम लुकमान कोवीड सेंटर उभारण्यात आले आहे.
मोहंमदिया ॲग्लो उर्दू हायस्कूलच्या इमारतीत उभारण्यात आलेले 100 बेड्सचे हकीम लुकमान कोवीड सेंटरचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री तथा पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
यावेळी महापौर गीता सुतार, आमदार सुधीर गाडगीळ, असिफ बाबा, नगरसेवक फिरोज पठाण, उमर गवंडी, कय्युम पटवेगार यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, कोरोना रूग्णांवर उपचारासाठी योग्य उपचार पध्दतीचा अवलंब केला पाहिजे. रूग्ण रूग्णालयात दाखल होताच तो पूर्णपणे बरा करण्यासाठी पूर्ण ताकद लावून काम केले पाहिजे. वेळेत व योग्य वेळी योग्य उपचार झाले पाहिजेत. यासाठी मुंबई येथील तज्ज्ञ डॉक्टरांसमवेत जिल्ह्यातील डॉक्टरांशी झुमव्दारे संवाद साधण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकेत असिफ बाबा यांनी हकीम लुकमान कोवीड सेंटरमध्ये 100 बेड्स असून त्यामध्ये 5 व्हेंटीलेटर बेड, 45 ऑक्सिजन बेड, 50 आयसोलेटेड बेड, 20 तज्ज्ञ डॉक्टर, 40 नर्सिंग स्टाफ, प्रत्येक रूमला सीसीटीव्ही कॅमेरा, नातेवाईकांच्या संपर्कसाठी इंटरकॉम आदि सुविधा असल्याची माहिती दिली. कोविड सेंटर उभारणीसाठी मदत केलेल्या सर्वांचे त्यांनी आभारही मानले.