सोलापूर : उजनी ते सोलापूर या मुख्य पाईपलाईनला वारंवार गळती लागली असून पाणी गळती मोठ्या प्रमाणावर होऊ लागली आहे. नादुरुस्त पाईपलाईन मोहोळच्या पुढे यावली येथे दुरुस्त केली जात आहे. मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात आहे. त्यामुळे सोलापुरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे.
पाईपलाईन दुरुस्तीच्या कामामुळे उजनी येथील पंप बंद ठेवले जाणार आहेत. आज गुरुवारी दुरुस्तीचे काम हाती घेतले असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य अभियंता संजय धनशेट्टी यांनी सांगितले. गुरुवारी व शुक्रवारी (ता. 25) शहर व हद्दवाढ भागातील पाणी पुरवठा विस्कळीत होणार आहे. उशीरा, कमी वेळ व कमी दाबाने पाणी नागरिकांना मिळणार आहे.
त्यामुळे नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा. शुक्रवारनंतर पाणी पुरवठा सुरळीत होईल, असा विश्वासही सार्वजनिक आरोग्य विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, रविवारपर्यंत (ता. 27) काम पूर्ण होईल. त्यानंतर सोमवारपासून पाणी पुरवठा पूर्ववत सुरु राहील, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.