सातारा : मराठा आरक्षणावरुन मराठा समाज आक्रमक असताना खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मोठं विधान केले आहे. समाजातील सर्व आरक्षण रद्द करा आणि मेरिटनुसार आरक्षण द्या, अशी मागणी खासदार उदयनराजे यांनी केली आहे.
याबाबत उदयनराजे म्हणाले की, मराठा समाजातील तरुणांना चांगले मार्क्स मिळूनही प्रवेश मिळत नाही, तर दुसरीकडे कमी मार्क्स मिळूनही इतर समाजातील मुलांना प्रवेश मिळतात. प्रत्येकाला देवाने बुद्धी दिली आहे. मेरिटवर आरक्षण द्यावं, सगळेच आरक्षण रद्द करावं, ज्याने कष्टच घेतले नाही, त्याला आरक्षणामुळे प्रवेश मिळते, आणि ज्याने कष्ट घेतले पण आरक्षण नाही म्हणून प्रवेश मिळत नाही, त्याचं मानसिकदृष्ट्या खच्चीकरण होते, नैराश्य येते, काहीजण आत्महत्या करतात, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
‘मराठा समाजावर वर्षानुवर्षे अन्याय होत आहे. गुणवत्ता असूनही अनेक मुले-मुली त्यांच्या भविष्याबाबत चिंतेत आहेत. या परिस्थितीमध्ये इतरांना ज्या पद्धतीने आरक्षण आहे, त्या पद्धतीने मराठा समाजाला देखील नोकरी आणि शिक्षणामध्ये आरक्षण द्यावे, ही रास्त मागणी आम्ही करत आहोत. या समाजाचे नेतृत्व कोणी करावे, यापेक्षा आरक्षणाचा प्रश्न सुटणे महत्त्वाचे आहे, असं मत खासदार उदयनराजे भोसले यांनी शनिवारी व्यक्त केलं होतं.
* मंथन बैठकीस आमंत्रण
शिवाजी महाराज स्मारक कृती व समन्वय समितीचे अध्यक्ष शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांनी शनिवारी सातारा येथे खा. उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेऊन ३ ऑक्टोबर रोजी पुणे येथे होणाऱ्या मराठा समाजाच्या विचार मंथन बैठकीसाठी आमंत्रण दिले. बैठकीला उपस्थित राहण्याचे आश्वासन दोघांनीही दिले.