सोलापूर / बीड : कोरोनाने देशभर थैमान घातले. कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांनाही कोरोनाने सोडले नाही. उपचारासाठी जागाच नसल्याने मोकळे असलेले महाविद्यालयाचा उपचारासाठी वापर केला. मात्र शिक्षा भोगत असलेले कैद्यांनी या महाविद्यालयातही आपले अवगुण उधळले आहेत. संताप निर्माण व्हावा, अशीच कृत्ये केली आहेत. यात आता संबंधित कैद्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
सोलापुरातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतिगृहाची नासधूस करण्यासोबतच पैसे देखील लुटल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे. सोलापुरातील कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर उपचार करण्यासाठी कोव्हिड सेंटर घोषित करण्यात आले होते. सोलापूर जिल्हा कारागृहातील संशयित कैद्यांना उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले होते.
राज्यात अचानक लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर विद्यार्थ्यांनी असेल त्या अवस्थेत आपलं गाव गाठलं होत. या वसतिगृहातील विद्यार्थिनींनी आपले महत्वाचे कागदपत्र, पैसे आणि कपडे कपाटातच बंद करून ठेवले होते. येथे उपचारासाठी आलेल्या या कैद्यांनी कपाटाचे कुलूप तोडून कागदपत्र फाडले, पैसे लुटले एवढेच नाही तर त्यांच्या कपड्यांवर खालच्या शब्दातील वाक्ये लिहून नासधूस केली.
या ठिकाणी राहणाऱ्या मुलींच्या कपड्यावर स्वतःचा फोन नंबर लिहून त्यावर अश्लील लिखाण करण्यात आले आहे. एवढंच नाही तर त्यांची महत्वाची वस्तू आणि सामानांची चोरी करण्यात आली. तसेच काही महत्वाची कागदपत्रे देखील फाडून टाकण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
हा सर्व प्रकार तिथं आयसोलेशनमध्ये वास्तव्यास असलेल्या एका महिलेनी मोबाईलमध्ये चित्रित करून एका मुलीला पाठविला आहे. या हॉस्टेलमध्ये दारुच्या बाटल्या देखील आढळून आल्या आहेत. इतकंच नव्हे तर त्या ठिकाणी पाण्याच्या बाटलीत अक्षरशः लघुशंका करून कपाटात ठेवण्यात आले आहेत. काही मुलींच्या लॅपटॉपमध्ये त्यांचा खासगी डाटा आहे. त्याचा दुरुपयोग करण्याची भीती मुलींनी व्यक्त केली आहे. हा सर्व प्रकार भीषण आणि किळसवाणा आहे. त्यामुळे पाच दिवसांपूर्वी तिथं आलेल्या रुग्णांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी बीडच्या मुलींनी केली आहे.
हा सर्व संतापजनक प्रकार आता समोर आल्याने अधिकाऱ्यांनी कारागृह पोलीस प्रशासनाकडून माहिती मागवली आहे. यावर आता काय कारवाई होणार हे महत्वाचं असलं तरी कोव्हीड सेंटरमध्ये होणारे हे गैर प्रकार कधी थांबणार? असे सवाल केले जात असून विद्यार्थिनींचे झालेले नुकसान कोण भरणार? असा संताप व्यक्त केला जात आहे.
* तृप्ती देसाई यांनी केली कारवाईची मागणी
सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी या प्रकाराचा निषेध व्यक्त केला आहे. हा प्रकार अत्यंत भीषण असून तिथं आतापर्यंत किती पुरुष रुग्ण होते याची माहिती घेऊन त्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली आहे. त्याशिवाय मुलींचे शैक्षणिक उपकरणे आणि कागदपत्रे ताब्यात घ्यावीत अशी मागणी देसाई यांनी केलीय. लवकर कारवाई झाली नसल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील तृप्ती देसाई यांनी दिला आहे.