नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या हाथरस येथील निर्भयाची दोन आठवड्यापासून मृत्यूशी सुरू असलेली झुंज मंगळवारी संपली. दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात तिने अखेरचा श्वास घेतला. चार नराधमांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. एवढेच नाहीतर तिची जीभ छाटली, कंबरेचे हाडही मोडले. बोलता येत नसतानाही या जांबाज तरुणीने इशाऱ्यावरून जबाब दिला आणि त्यावरून पोलिसांनी चारही बलात्काऱ्यांना बेड्या ठोकल्या आहेत.
14 सप्टेंबर रोजी उत्तरप्रदेशातील हाथरस जिह्यात चंदपा या चिमुकल्या गावात काळीज गोठवून टाकणारी घटना घडली. गंभीर जखमी पीडित तरुणीला आधी अलिगड मुस्लिम विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले. नंतर त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे लक्षात घेऊन दिल्लीतील एम्सला रुग्णालयात दाखल करण्यात आले. 15 दिवसांपूर्वी हाथरसमध्ये सामूहिक बलात्काराची ही घटना घडली होती. काल मंगळवारी सकाळी सामूहिक बलात्कार पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आई व भावाबरोबर शेतात जनावरांसाठी चारा आणण्यासाठी गेलेल्या दलित तरुणीला गावातीलच चार उच्चवर्णिय तरुणांनी बाजरीच्या शेतात ओढून नेले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. बलात्कार केल्यानंतर या नराधमांनी तरुणीची जीभ कापली, तिच्या कंबरेचे हाड मोडले. बेशुद्धावस्थेत आढळलेल्या या मुलीला सुरूवातीला अलिगड वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. 19 सप्टेंबर रोजी दंडाधिकारी तिचा जबाब नोंदवण्यासाठी पोहोचले. मात्र तिला बोलताच येत नव्हते. 22 सप्टेंबर रोजी तरुणीने इशाऱ्यावरून आपबिती कथन केली. त्यावरून पोलिसांनी संदीप, रामपुमार, लवुश आणि रवि या चौघांना अटक केली आहे. पोलिसांनी पाच दिवस काय केले असा सवाल पीडितेच्या कुटुंबाने केला आहे. तरुणीवर अत्याचार करणारे गावातीलच आहेत. ते नेहमीच गुंडगिरी करतात. पोलीस, कायद्याचा त्यांना धाक नाही. आता गावात परत जाण्याचीही भीती वाटते असे पीडितेचा भाऊ म्हणाला.
हाथरस येथील सामुहिक बलात्काराच्या घटनेवरून बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनी उत्तर प्रदेश पोलिसांवर टीकेची झोड उठवली. पोलिसांनी नराधमांना वाचवण्यासाठी आपली शक्ती पणाला लावली असा आरोपही त्यांनी केला. उत्तर प्रदेश पोलिसांनीही मायावती यांना ट्विटवरून उत्तर दिले असून चार आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती दिली आहे. पीडितेच्या जबाबावरून नंतर सामुहिक बलात्काराचे कलम लावण्यात आल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे.
* योगी सरकारची कानउघाडणी
या प्रकरणामुळे दिल्लीत गाजलेल्या निर्भया प्रकरणाचीच पुनरावृत्ती झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागली आहे. दरम्यान, हाथरस सामूहिक ब्लात्कार प्रकरणावर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दुःख व्यक्त केलं आहे. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेश सरकारलाही खडे बोल सुनावले. ‘फिल्म सिटी’ऐवजी ‘गुंडांपासून क्लिन सिटी’वर भर द्या असा सल्ला देत देशमुख यांनी योगी सरकारची कानउघाडणी केली.
याबाबत देशमुख यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून #यूपी_की_निर्भया_को_न्याय_दो या हॅशटॅगसह ट्विट करताना, ‘उत्तरप्रदेश येथील हाथरसमधल्या सामुहिक बलात्कारातील पीडितेचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी गुन्हेगारांना शासन करा. पण ‘फिल्म सिटी’ऐवजी ‘गुंडांपासून क्लिन सिटी’वर आपण भर दिलात तर माताभगिनींसाठी अधिक उपयुक्त ठरेल.’ अशी भूमिका मांडली.