लखनौ : काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना पीडित मुलीच्या कुटुंबीयांची आज भेट घेण्यासाठी उत्तरप्रदेश सरकारकडून परवानगी मिळाली. तब्बल २ दिवसांच्या संघर्षानंतर अखेर आज राहुल आणि प्रियांका गांधी पीडितेच्या घरी पोहोचले. यावेळी, पीडितेच्या कुटुंबीयांना मात्र आपले अश्रू अनावर झाले. राहुल आणि प्रियांका गांधींनी यावेळी पीडितेच्या कुटुंबियांचे सांत्वन करत त्यांची स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
* घेतली पीडित कुटुंबानी गळाभेट
प्रियांका यांनी पीडितेच्या घरी जाताच पीडित तरुणीच्या आईची गळाभेट घेतली. यावेळी, प्रियांका यांनाही अश्रू अनावर झालायचे पाहायला मिळाले. तर दुसरीकडे राहुल गांधींनी देखील पीडितेच्या कुटुंबियांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा, त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे, ‘आम्ही न्यायासाठी संघर्ष करू. तुम्ही एकटे नाहीत.
* जिल्हाधिका-यावर कारवाईची मागणी
काँग्रेस आणि गांधी कुटुंब तुमच्यासोबत आहेत’, असा विश्वासही राहुल गांधींनी पीडित मुलीच्या कुटुंबाला दिला आहे. जवळपास अर्धा तास राहुल आणि प्रियांका गांधी हे पीडितेच्या कुटुंबियांशी बोलत होते. त्यानंतर राहुल गांधींनी माध्यमांशी संवाद साधला. हाथरस’ पीडितेच्या कुटुंबीयांनी अशी मागणी केली आहे कि, ‘जिल्हाधिकाऱ्याचे केवळ निलंबन नव्हे तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. त्याचप्रमाणे, दोषींवरही कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी’, अशी मागणी पीडितेच्या कुटुंबीयांनी केली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* संघर्ष चालूच राहणार
‘जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही संघर्ष करत राहू’, असे आश्वासन यावेळी राहुल गांधींनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिले आहे. तर, उत्तर प्रदेशचे योगी सरकार हि संपूर्ण परिस्थिती हाताळण्यात आणि पीडित मुलीच्या कुटुंबाला सुरक्षा देण्यात सपशेल अपयशी ठरल्याची टीकाही यावेळी राहुल गांधींनी केली आहे. तर दुसरीकडे माध्यमांशी बोलताना प्रियांका गांधी म्हणाल्या कि, ‘आम्ही अन्यायाविरुद्ध लढतच राहणार आहोत. पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देईपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहील. आमचा आवाज कुणीही दाबू शकणार नाही.
* प्रियांकाच्या खांद्यावर डोके, व्यक्त केली खंत
अत्यंत दु:खात असलेल्या त्या कुटुंबीयांसोबत राहुल व प्रियांका गांधी यांनी बातचीत केली. यावेळी हाथरस प्रकरणातील पीडितेच्या आईने प्रियांका गांधी यांच्या खांद्यावर डोकं ठेवून आपलं दु:ख व्यक्त केलं. यावेळी त्या ढसाढसा रडल्या. मुलीला इतक्या क्रुरपणे मारण्यात आले व त्यानंतर तिचं शेवटचं दर्शनही घेता आले नसल्याने कुटुंबीय अत्यंत भावूक झाले. कुटुंबीयांकडून मुलीच्या न्यायाची मागणी केली जात आहे. राहुल व प्रियांका गांधी यांनाही याबाबत कडक पवित्रा घेतल्याचे दिसून येत आहे.
पीडित कुटुंबीयांचे सांत्वन आणि भेट घेण्यासाठी राजकीय पक्ष हाथरसमध्ये येण्याचा प्रयत्न करत आहे. पण, उत्तर प्रदेश पोलीस आणि हाथरस जिल्हा प्रशासनने पीडितेच्या गावाला गेल्या 3 दिवसांपासून कडक पहारा लावला आहे. पीडितेचे कुटुंब गेल्या 3 दिवसांपासून घरात अडकून पडले आहे. पोलिसांनी पीडितेच्या गावाच्या सीमा बंद केल्या आहे. या परिस्थितीत पीडितेच्या भावाचा एक व्हिडिओही समोर आला आहे.