लखनौ : हाथरस येथील अत्याचार प्रकरणावरुन देशभरात वातावरण पेटले आहे. या मुद्द्यावर उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे सरकार तोंडघशी पडली आहे. यामुळे राज्य सरकारने अखेर या प्रकरणाची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवली आहे. या प्रकरणावरुन एवढा गदारोळ सुरू असताना उत्तर प्रदेशातील सत्ताधारी भाजप आमदाराने बलात्कारासाठी मुलींच्या पालकांनाच जबाबदार धरले आहे. त्यांच्या विधानावरुन ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात लक्ष्य होत आहे.
हाथरसमधील 19 वर्षांच्या दलित युवतीवर चार जणांनी अत्याचार केला होता. ही घटना दोन आठवड्यांपूर्वी घडली होती. नंतर उपचारादरम्यान दिल्लीतील रुग्णालयात त्या युवतीचा मृत्यू झाला होता.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट पसरलीआहे. यातच पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने त्या पीडितेच्या कुटुंबीयांना विश्वासात न घेता परस्पर तिच्यावर अंत्यसंस्कार केले होते. पोलिसांनी या प्रकरणी पुरावे नष्ट केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशातील भाजप सरकार अडचणीत आले आहे. असे असताना भाजपचे बलिया मतदारसंघातील आमदार सुरेंद्रसिंह यांनी नवा वाद ओढवून घेतला आहे. त्यांनी म्हटले आहे की, पालकांनी मुलींवर संस्कार केल्यास बलात्कारच होणार नाहीत. बलात्कारासारख्या घटना केवळ संस्कारातून थांबू शकतात. शिक्षा अथवा तलवारीने असे प्रकार थांबू शकत नाहीत. सर्व माता-पित्यांचे कर्तव्य आहे की त्यांनी आपल्या तरुण मुलींना संस्कारी वातावरणात शालिनतेने वागणे शिकवायला हवे.
सरकारचा धर्म हा संरक्षण करणे हा असून, कुटुंबाचा धर्म हा मुलांना चांगली मूल्ये शिकवणे हा आहे. सरकार आणि चांगली मूल्ये यांच्या संयोगातून आपण देश सुंदर बनवू, असेही सिंह यांनी म्हटले आहे. सिंह यांच्या विधानावरुन सोशल मीडियावर ते मोठ्या प्रमाणात लक्ष्य झाले आहेत. मुलींवर संस्कार करायला शिकवण्याऐवजी मुलांवर योग्य संस्कार व्हायला हवेत, हे आधी आमदारांनी लक्षात घ्यावे, असा सल्ला त्यांना सोशल मीडियावर देण्यात आला आहे