सातारा : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासोबत धनगर नेत्यांची झालेली बैठक धनगर समाजाला विश्वासात न घेता आयोजित केली असल्याचा आरोप ऑल इंडिया धनगर समाजाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांनी केला आहे. त्यामुळे आरक्षणासाठी नियोजित 16 ऑक्टोबरला होणारे राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन होणारच असल्याचा निर्धार काकडे यांनी बोलून दाखवला आहे.
साताऱ्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांसोबत झालेली धनगर नेत्यांची बैठक ही समाजाला विश्वासात न घेता झाली आहे, असा आरोप काकडे यांनी केला. धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार दुर्लक्ष करत आहे, अशी टीका त्यांनी केली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* धनगर समाजात दुही
नुकतीच धनगर समाजातील नेत्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समवेत आरक्षणाबाबत बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी जरी आश्वासन दिले असले तरी धनगर समाजात मात्र अजुनही एकी नसल्याचे स्पष्ट होत आहे. ऑल इंडिया धनगर समाज दिल्ली- महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रविण काकडे यांनी या बैठकीबाबत नाराजी व्यक्त करत धनगर समाजातील लोकांना विश्वासात घेतले नसल्याचा आरोप केला.
यामुळे धनगर समाजासाठी आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करून धनगर समाजाला एस. टी. सर्टिफिकेट मिळावीत आणि आदिवासी समाजाच्या सवलती लागू कराव्यात या प्रमुख मागण्यांसाठी येत्या 16 ऑक्टोबरला संपूर्ण राज्यभरात धनगर समाज रस्त्यावर उतरुन रास्ता रोको आणि चक्काजाम आंदोलन करणार असल्याची घोषणा काकडे यांनी पत्रकार परिषदेत केली.