पुणे : मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणास स्थगिती दिल्याने मराठा समाज आक्रमक झाला आहे. राज्यभरात आंदोलन देखील करण्यात येत आहे. राज्यभरातील मराठा समाजाच्या बैठका होत आहेत. दरम्यान ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना छत्रपती घराण्याच्या वंशजांबद्दल अपमानकारक वक्तव्य करणं त्यांना चांगलंच भोवलं आहे.
मराठा आरक्षणाविरुद्ध न्यायालयात याचिका दाखल करून लढणाऱ्या ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीमध्ये बोलताना अफजलाच्या औलादी आणि अफजलाच्या वृत्तीचे….. मी असल्या छत्रपती गाद्यांना मानत नाही, असे सदावर्ते म्हणाले होते. यावर मराठा समाजाने आक्रमक पावित्रा घेतला होता. छत्रपती घराण्याच्या वंशजांबद्दल अपमानकारक वक्तव्य करणं त्यांना चांगलंच भोवलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सदावर्ते यांच्याविरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याप्रकरणी सदावर्ते अडचणीत आले आहेत. अमर रामचंद्र पवार असे तक्रार दाखल करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.
गेल्या दोन दिवसांपासून सदावर्तेंवर गुन्हा दाखल करण्यासाठी मराठा समाजाचे कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडला होता. त्यानंतर आज अखेर भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान याप्रकरणी काल नाशिकमधील सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दखल करण्यात आला होता.