नवी दिल्ली : हाथरसमधील सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. तपास हाती घेतल्यानंतर सीबीआयनं प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला असून, तपासासाठी समितीही नियुक्त केली आहे. हाथरसमध्ये झालेल्या या घटनेननंतर देशात संतापाची लाट उसळी होती. या घटनेचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी होत होती. त्यामुळे योगी सरकारनं सीबीआय चौकशीची शिफारस केली होती.
उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये दलित युवतीवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि मृत्यू प्रकरणाच्या तपासाची सूत्रे आता केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आपल्या हाती घेतली आहेत. आता सीबीआयनं या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच तपासासाठी एक समितीही नियुक्त केली आहे. हाथरस प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर सीबीआयने माहिती दिली आहे. एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू करण्यात आला असल्याचे सीबीआयनं म्हटलं आहे.
उत्तर प्रदेशातील हाथरस प्रकरणाचे पडसाद देशात उमटले. त्या प्रकरणाचा आणि प्रकरणाच्या हाताळणीवरून उत्तरप्रदेश सरकारचा निषेध केला गेला. या प्रकरणात उत्तर प्रदेश पोलिसांनी प्रकरणाची नोंद करून घेण्यास केलेला उशीर, पीडित तरुणीच्या कुटुंबावर टाकण्यात आलेला दबाव, कुटुंबाला भेटण्यापासून मीडियाला रोखणे, अशा अनेक प्रकारांमुळे उत्तर प्रदेश पोलिसांच्या भूमिकेकडे बोट केले जात होते.
* कुटुंबाने रात्री प्रवास करण्यास दिला नकार
पीडित तरुणीचा मृतदेह पोलिसांनी परस्पर जाळल्यानंतर, या प्रकरणाचा भडका देशभर उडाला. संबंधित तरुणीच्या कुटुंबाला सध्या पोलिस संरक्षण देण्यात आलं असलं तरी, तिचे कुटुंब भितीच्या छायेत वावरत आहे. पीडित तरुणीच्या कुटुंबाला जबाब नोंदवण्यासाठी हायकोर्टात जावे लागणार आहे.
त्यासाठी त्यांना हाथरस येथून लखनौ येथे हायकोर्टात नेण्यात येणार आहे. अर्थातच पोलिस बंदोबस्तात त्यांना नेण्यात येईल. परंतु, रात्री प्रवास करण्यास पीडितेच्या कुटंबीयांनी नकार दिला आहे. या संदर्भात टाईम्स ऑफ इंडियाने एक वृत्त दिले आहे. त्यात म्हटले आहे की, सुरुवातीला पोलिस प्रशासन पीडितेच्या कुटुंबाला दिवसा हायकोर्टात घेऊन जाण्यास तयार झाले होते. त्यानंतर त्यांनी रात्री प्रवास करण्याचा प्रस्ताव दिला आहे. कुटुंबाने रात्री प्रवास करण्यास नकार दिलाय.