सांगली : एकाच मुलीबरोबर दोन मित्रांच्या प्रेम प्रकरणातून सांगलीत निर्घृण खुन झाला आहे. बॉम्बे रेयॉन कंपनीच्या पाठीमागे पेठ-जांभूळवाडी रस्त्यावर आज बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास हा खून झाला. या घटनेने पेठ व जांभूळवाडी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
जांभूळवाडी (ता. वाळवा) येथील अभिजीत हरी शेलार (वय 22) या महाविद्यालयीन युवकाचा त्याचा मित्र राजेंद्र मारुती बांदल (वय 25) याने धारदार शस्त्राने गळ्याचा कंठ तोडून सपासप 12 वार करत खून केला आहे. संशयित राजेंद्र बांदल हा खून केल्यानंतर स्वतःहून इस्लामपूर पोलिस ठाण्यात हजर झाला. त्याने खुनाची कबुली दिली आहे. या बाबतची फिर्याद मृत अभिजीतची आई सुवर्णा हरी शेलार यांनी इस्लामपूर पोलिस ठाण्यात दिली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मृत अभिजीत व राजेंद्र हे दोघेही एकमेकांचे चांगले मित्र होते. दोघेही अविवाहीत आहेत. संशयित राजेंद्र बांदल याचे गावातीलच एका मुलीबरोबर अलिकडेच प्रेमसंबंध जुळले होते. यापूर्वी त्याच मुलीबरोबर मृत अभिजीत याचे प्रेमसंबंध होते. त्यामुळे राजेंद्र बांदल हा अभिजीतला तु आमच्या प्रेमामध्ये येऊ नकोस, मला अडथळा आणू नकोस असे अभिजीतला बजावत होता. मात्र अभिजीत आपल्या प्रेमात अडथळा असल्याने त्याला आज बॉम्बे रेयॉन कंपनीच्या मागे गाठून राजेंद्रने त्याचा खून केला.
अभिजीत हा मूळचा पेठेचा असून त्याचे मामा जांभूळवाडीत आहेत. राजेंद्र व त्याची बऱ्याच दिवसापासून मैत्री होती. मात्र या मैत्रीत प्रेमसंबंधाचा अडसर झाल्याने त्याचा काटा राजेंद्रने काढला. मृत अभिजीतचा गळा धारदार शस्त्राने तोडून त्याच्या डोक्यात, पोटात, अंगावर एकुण 12 सपासप वार केले. खुनानंतर संशयित राजेंद्र हा इस्लामपूर पोलिस ठाण्यात स्वतः हजर झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रात्री उशिरा येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. खुनाची माहिती कळताच पोलिस उपाधिक्षक कृष्णात पिंगळे घटनास्थळी दाखल झाले.