नवी दिल्ली : बहुचर्चित कोळसा घोटाळ्याप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने माजी केंद्रीय मंत्री दिलीप रे यांना तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. तत्कालीन वाजपेयी सरकारच्या कार्यकाळात कोळसा राज्यमंत्री असलेल्या दिलीप रे यांना न्यायालयाने २१ वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात ही शिक्षा सुनावली आहे.
अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये मंत्री असताना दिलीप राय यांनी १९९९ साली झारखंड मधील कोळसा खाणीचे परवाने देताना त्यांनी भ्रष्टाचार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. राय यांच्या खेरीज कोळसा मंत्रालयातील तत्कालिन वरिष्ठ अधिकारी प्रदीपकुमार बॅनर्जीे आणि नित्यानंद गौतम तसेच कॅस्ट्रॉन टेक्नॉलॉजिसचे संचालक महेंद्रकुमार आगरवाल हे या प्रकरणात आरोपी आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सन १९९९ मध्ये झारखंडमधील कोळसा खाणीचे वाटप करण्यात आले होते. नियमबाह्यरित्या या खाणीचे वाटप करण्यात आल्याचा आरोप सीबीआयने ठेवला होता. या प्रकरणात रे यांच्याशिवाय अन्य दोघे आरोपी होते. तिन्ही आरोपींना प्रत्येकी तीन वर्षांच्या तुरुंगवासाची तसेच प्रत्येकी १० लाख रुपयांचा दंड भरण्याची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे.
विशेष न्यायालयाने काही दिवसांपूर्वी कोळसा खाण घोटाळा प्रकरणात तिघांना दोषी ठरविले होते व दोषींना किती शिक्षा द्यायची याचा निकाल राखून ठेवला होता. त्यानुसार न्यायमूर्ती भरत पराशर यांनी सोमवारी दोषींना शिक्षा सुनावली.
न्यायालयाने दोषी ठरविलेल्यामध्ये प्रदीपकुमार बॅनर्जी, नित्यानंद गौतम यांचा समावेश असून कॅस्ट्रोन टेक्नोलॉजीज लिमिटेड (सीटीएल) नावाची कंपनी, या कंपनीचे संचालक महेंद्रकुमार अग्रवाल व कॅस्ट्रॉन मायनिंग नावाच्या कंपनीला दोषी ठरविले होते. न्यायालयाने सीटीएलला ६० लाख रुपयांचा तर सीएमएलला १० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.