मुंबई : राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या 12 जागांसाठी महाविकास आघाडीतील मित्रपक्षांमध्ये मोठी खलबतं झाली. त्यानंतर ही नावे निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे. यामध्ये शिवसेनेकडून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिचं देखील नाव आल्याने चांगलीच चर्चा झाली. आता उर्मिलाने शिवसेनेची ऑफर स्वीकारल्याचं वृत्त समोर आलं आहे.
‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: उर्मिला मातोंडकर यांच्याशी फोनवरून चर्चा केली होती. त्यानंतर उर्मिला यांनी या प्रस्तावाला होकार दिला आहे,’ अशी माहिती शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ या दैनिकाशी बोलताना दिली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
2019 च्या लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर उर्मिला मातोंडकरने काँग्रेसमध्ये प्रवेश करत ही निवडणूक लढवली. मात्र निवडणुकीच्या मैदानात तिला अपयश आलं. तसंच या निवडणुकीनंतर तिचे पक्षात मतभेद झाले आणि ती काँग्रेसपासून दूर झाली. काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिने सुशांतच्या मुद्द्यावर ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न केल्यानंतर उर्मिला आक्रमकपणे माध्यमांसमोर आली आणि तिने कंगनाला जोरदार प्रत्युत्तर दिलं. यानंतरच तिची शिवसेनेशी जवळीक वाढल्याचं बोललं जात आहे.
* मंत्री परबांनी फेटाळले होते नाव
उर्मिला मातोंडकर हिचं नाव शिवसेनेकडून विधानपरिषदेसाठी चर्चेत आल्यानंतर शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री अनिल परब यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना परब म्हणाले की, ‘चव्हाट्यावर बसून चर्चा करायची ही नावे नाहीत. राज्य सरकार काळजीपूर्वक नाव देत आहे. यासंदर्भात कॅबिनेटनं ठराव केला आहे. स्थगिती देण्याचा अधिकार कुणाला आहे असं वाटत नाही. उर्मिलाचे नाव आमच्याकडं चर्चेत नाही.’
दरम्यान अनिल परब यांनी उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची चर्चा फेटाळलेली असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ऑफर स्वीकारल्याचा दावा केल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.