पुणे : विधान परिषदेसाठी अभिनेते शरद पोंक्षे यांना शिवसेनेकडून उमेदवारी देणार असल्याची चर्चा सध्या आहे. हिंदुत्व आणि सावरकरांवरुन भाजप नेहमीच शिवसेनेला लक्ष्य करत असते. या पार्श्वभूमीवर भाजपला तोडीसतोड उत्तर देण्यासाठी शिवसेनेकडून शरद पोंक्षे यांचे नाव देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून कला, साहित्य, समाजसेवा आणि सहकार या क्षेत्रांशी संबंधित १२ व्यक्तींची महाराष्ट्राच्या विधान परिषदेवर वर्णी लागणार आहे. त्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून प्रत्येकी ४ नावांची शिफारस करायची आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही १२ नावे चर्चेअंती निश्चित करण्यात आल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात या नावांत आयत्यावेळी बदल करण्याचे धोरण तिन्ही पक्षांनी अवलंबले असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सोमवारी ही यादी राज्यपालांकडे पाठवली जाण्याची शक्यता आहे. त्याआधी प्रत्येक नावावर सखोलपणे विचार करण्यात येत आहे.
दरम्यान, सावरकर मुद्द्यावरुन शरद पोंक्षे यांचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाशी नेहमीच मतभेद राहिले आहेत त्यामुळे शरद पोंक्षे हे नाव महाविकासआघाडीतील राष्ट्रवादी आणि काँग्रेसला चालणार आहे का? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. मात्र, अद्याप यासंदर्भात अधिकृत माहिती आलेली नाही.
दरम्यान,पोंक्षे यांच्या नावाला संभाजी ब्रिगेडने तीव्र विरोध दर्शविला आहे. पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये पोंक्षे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.शरद पोंक्षे हा अत्यंत वैचारिक दृष्ट्या ‘विषारी’ माणूस आहे. पोंक्षे चे सामाजिक व राजकीय कार्य काय…? तो १००% सनातनी आहे. अशा व्यक्तीची शिवसेने कडून विधान परिषदेसाठी चर्चा होते हे दुर्दैवी आहे असं त्यांनी म्हटलं आहे. पाहूया शिंदे यांची फेसबुक पोस्ट टाकली आहे.