पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरही राज्यातील राजकीय घडामोडींना पुन्हा वेग आला आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि महागठबंधनचे प्रमुख नेते तेजस्वी यादव यांनी सर्व आमदारांना पुढील एक महिना पाटण्यातच थांबण्याची विनंती केली आहे. बिहारमध्ये सत्ता महागठबंनचीच येणार, असं आश्वासन त्यांनी दिलं आहे.
बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या निवासस्थानी आज गुरुवारी महागठबंधनच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत तेजस्वी यादव यांनी आमदारांना संबोधित केलं. बिहारमध्ये भाजपप्रणित एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. त्यामुळे एनडीए पुन्हा सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत आहे. मात्र, खातेवाटपावरुन एनडीएतील घटकपक्षांमध्ये बिनसलं तर त्याचा लगेच फायदा घ्यायचा, अशी तेजस्वी यादव यांची रणनिती असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दुसरीकडे बिहारमध्ये काँग्रेसचे काही आमदार भाजपसोबत हातमिळवणी करण्याच्या तयारीत असल्याचा संशय तेजस्वी यांना आहे. त्यामुळे त्यांनी सर्व आमदारांना पाटण्यातच थांबवण्याचं आवाहन केलं आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तेजस्वी यादव यांनी आज निकालावर प्रतिक्रिया दिली. “परिणाम आणि निर्णय या दोन गोष्टींमध्ये फरक असतो. निवडणुकीचे परिणाम त्यांच्या बाजूने तर निर्णय आपल्या बाजूने आहे”, असं तेजस्वी यादव आमदारांना म्हणाले.
“मी नम्रपणे हात जोडून बिहारच्या जनतेचं आभार मानतो. जनतेचा निर्णय महागठबंधनच्या बाजूने आहे. आम्हाला जवळपास 130 जागा मिळाल्या आहेत. मात्र, नितीश कुमार यांनी फसवणूक करुन सरकार बनवलं”
तेजस्वी यादव – महागठबंधनचे प्रमुख नेते