भुवनेश्वर : एक 11 वर्षीय मुलीने 10 किलोमीटर चालून आपल्या वडिलांविरोधात तक्रार दाखल केल्याची घटना ओडिशाच्या एका गावात घडली आहे. मुलीने केंद्रापारा जिल्हाधिकाऱ्यांना आपली लिखित तक्रार दिली आहे. वडील जबरदस्तीने मध्यान्ह भोजनाचे पैसे आणि तांदूळ तिच्याकडून घेत असल्याची तक्रार मुलीने केली आहे. मुलीच्या आईचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर वडिलांनी दुसरे लग्न केले आणि आता तिची काळजी घेण्यास ते नकार देत असल्याचे तिचं म्हणणं आहे.
आपले वडील मध्यान्ह भोजन योजनेच्या फायद्यामध्ये घोटाळा करत असल्याची तक्रार दाखल करण्यासाठी सहावीतल्या मुलीने तब्बल १० किमी चालत जाऊन जिल्हा दंडाधिकाऱ्याकडे वडिलांविरोधात तक्रार दाखल केली. ओडिशा राज्यातील केंद्रापारा जिल्ह्यात ही घटना घडली आहे. मुलीचे नाव सुश्री संगीता सेठी (११ वर्ष) असे या मुलीचे नाव आहे. डुकुका विद्यापीठ शाळेत ती शिक्षण घेत आहे. या मुलीच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकारी समर्थ वर्मा यांनी वडील रमेश चंद्रा सेठी यांच्याविरोधात कारवाई करत मध्यान्ह भोजन योजनेतून मिळणारे पैसे आणि तांदूळ मुलीला पुन्हा देण्याचे आदेश दिले.
सुश्रीने दिलेल्या तक्रारीनुसार, तिच्या आईचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले आहे.
तिच्या वडिलांनी दुसरे लग्न केले असून सुश्रीचा सांभाळ करण्यात त्यांनी नकार दिलेला आहे. त्यामुळे सुश्री आपल्या मामाच्या घरी राहते. कोविड काळात लॉकडाऊन झाल्यानंतर केंद्र सरकारने मध्यान्ह भोजन योजनेतंर्गत विद्यार्थी किंवा त्यांच्या पालकांच्या बँक खात्यात प्रतिदिन आठ रुपये या हिशोबाने पैसे दिलेले आहेत. सुश्रीने सांगितल्यानुसार, तिचे बँक खाते असूनही शाळेतील प्रशासनाने तिच्या वडिलांच्या बँक खात्यात पैसे वळते केले. तसेच तिच्या नावाने मिळणारे तांदूळ देखील वडिलांना दिले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आपल्या वाट्याचे पैसे आणि तांदूळ सुश्रीने वडिलांकडे मागितला. मात्र वडिलांनी त्यासाठी साफ नकार दिला. सुश्रीच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकारी समर्थ वर्मा यांनी या प्रकरणाची सुनावणी घेत जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. इथून पुढे मुलीच्या खात्यामध्येच मध्यान्ह भोजन योजनेचे पैसे हस्तांतर करावेत आणि तांदूळ मुलीच्या हातातच द्यावेत, असे सांगितले. तसेच मुलीच्या नावावर तिच्या वडिलांनी आतापर्यंत जेवढे पैसे काढले आहेत, ते पैसे आणि तांदूळ पुन्हा वसूल करण्यात यावा, असेही आदेश जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांना दिले.
जिल्हा शिक्षण अधिकारी संजीब सिंह यांनी सांगितले की, आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावर तात्काळ अंमलबजावणी करत आहोत. यापुढे सुश्रीच्या खात्यावर योजनेचे पैसे वळते करणार असून तिच्या वडिलांवर वसुलीची कारवाई करण्यात येणार आहे. तसेच यापुढे विद्यार्थ्यांच्या हातातच तांदूळ द्यावेत, असेही निर्देश शाळेतील मुख्याध्यापकांना देण्यात आल्याचे संजीब सिंह यांनी सांगितले.