नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटामुळे आधीच करोडो लोकांच्या नोकऱ्या, रोजगार गेला असताना आता आणखी एक धक्कादायक बाब समोर येत आहे. कोरोनामुळे कर्मचाऱ्यांची उणीव भासल्याने मोठमोठ्या कंपन्यांनी अॅटोमेशनला प्राधान्य दिले आहे. यामुळे जगभरातील तब्बल 85 दशलक्ष नोकऱ्या संपुष्टात येणार आहेत.
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने केलेल्या पाहणीमध्ये ही धक्कादायक बाब समोर आली आहे. मध्यम ते मोठ्या कंपन्यांनी पुढील पाच वर्षांत त्यांचे काम रोबोटवर करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. जगभरातील मोठमोठ्या 300 कंपन्यांचा अभ्यास करण्यात आला. या कंपन्या त्यांचे काम डिजिटलायझेशन आणि नवीन अॅटोमेशनवर हलविण्याच्या तयारीला लागल्या आहेत.
आता सध्याच्या कर्मचाऱ्यांना या नव्या प्रणालीवर काम करण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान, स्कील्स आत्मसात करावे लागणार आहेत. यासाठी त्यांना पैसाही खर्च करावा लागणार आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
हा एकप्रकारचा कोरोना संकटाचा साईड इफेक्टच आहे. हा अहवाल अशावेळी आला आहे, जेव्हा या कंपन्यांचे लाखो कर्मचारी घरातून काम करूनही कंपन्यांना कर्मचारी कपात करावी लागली होती, असे WION ने म्हटले आहे.
अमेरिकेच्या कामगार विभागाच्या आकडेवारीनुसार अमेरिकेत नोकरी गेलेल्यांनी केलेल्या अर्जांची संख्या गेल्या सात आठवड्यांतील उच्चांकी असल्याचे म्हटले आहे. गेल्या आठवड्यात 898,000 च्या सात आठवड्यांच्या उच्चांकावर पोचले. यामध्ये 53,000 वाढ झाली आहे. ही वाढ खूप मोठी असल्याचे म्हटले आहे.
कंपन्या डेटा एंट्रीच्या कामासाठी लोकांऐवजी तंत्रज्ञानाचा वापर करत असल्यामुळे रोजगार निर्मिती ठप्प आणि नोकरी नष्ट होत असल्याचे अहवालात म्हटले आहे. दुसरीकडे कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) मुळे 97 दशलक्ष नोकऱ्या उपलब्ध होत असल्याचेही अहवालात म्हटले आहे. मात्र यासाठी कर्मचाऱ्यांना नवनवीन स्किल शिकावी लागणार आहे. हे एक मोठे आव्हान असणार आहे.