बार्शी : बार्शीहून सोलापूरकडे निघालेल्या एसटी बसच्या चालकाने नियंत्रण गमावल्याने बसची छोटा हत्ती आणि छोटा हत्तीची क्रेनला धडक बसली. या झालेल्या विचित्र अपघातात बसचा चालक, छोटा हत्तीचा चालक आणि काही प्रवाशी जखमी झाले आहेत.
त्यांच्यावर सोलापूर, बार्शी, वैराग येथील दवाखान्यात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा दाखल नाही. बसच्या चालकाला किरकोळ जखमा झाल्या आहेत तर छोटा हत्तीच्या चालकाला डोक्याला व हाताला मार लागला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
बार्शी आगाराची (क्र. एमएच 07, सी 7334) ही विना वाहक- विना थांबा बस दुपारी दोन च्या सुमारास सोलापूरला जात असताना वैरागच्या पुढे राळेरासच्या अलीकडे असलेल्या वळणावर चालक विजय स्वामी (वय 46 रा. वडाळा ता. उत्तर सोलापूर) याने बसवरील नियंत्रण गमावल्याने प्रथम समोरील छोटा हत्ती (क्र. एमएच 13 एन 2592) ला जोरात धडकली.
बस वेगात असल्यामुळे या धडकेने छोटाहत्ती त्यापुढील क्रेन वर धडकून जागेवरच पलटी झाला. तर बस पुढे उजव्या बाजूला झाडांना घासत जावून थांबली. या अपघातात बसचा चालक स्वामी, छोटाहत्तीचा चालक गोविंद श्रीकांत वाघमारे (वय 35 रा. वैराग) तसेच प्रवाशी जखमी झाले. छोटाहत्ती बेकरीचे सामान घेवून परिसरातील दुकानांना वाटप करण्यासाठी जात होता. बसचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला, असे सांगण्यात येत होते, मात्र घटनास्थळी उपस्थित असणारांनी बसच्या चालकाने नियंत्रण गमावल्यामुळे अपघात झाल्याचे सांगितले.