सोलापूर : भाजप खासदार जय सिद्धेश्वर स्वामी यांच्याविरुद्ध पंढरपुरात गुन्हा दाखल झाला आहे. खासदार जय सिद्धेश्वर महास्वामींवर आचारसंहिता भंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
नुकत्याच झालेल्या शिक्षक-पदवीधर मतदान प्रक्रियेदरम्यान खासदार जय सिद्धेश्वर स्वामी यांनी पंढरपूर शहरातील द.ह. कवठेकर प्रशाळेत 430 क्रमांकाच्या मतदान केंद्रात थेट प्रवेश केला होता. या प्रकारावर राष्ट्रवादीनं आक्षेप घेतला आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संदीप मांडवे यांनी खासदार जय सिद्धेश्वर स्वामी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आदर्श आचारसंहितेच्या नियमानुसार, मतदान प्रक्रिया सुरू असताना कर्मचारी, उमेदवार प्रतिनिधी, निवडणूक निरीक्षक व मतदार याशिवाय कोणालाही निवडणूक केंद्रात जाण्याची परवानगी नसते. मात्र, तरी देखील सोलापूरचे भाजप खासदार जय सिद्धेश्वर स्वामी यांनी थेट मतदान केंद्रात प्रवेश केला होता. या प्रकारावर राष्ट्रवादी काँग्रेसन आक्षेप घेत खासदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्याचबरोबर मतदान केंद्रात अनधिकृत प्रवेश केल्याप्रकरणी दीपक साळुंखे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
सहायक निवडणूक अधिकारी अनिकेत मानोरकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पंढरपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये खासदार महास्वामींवर भादंवि कलम 171 (फ) आणि 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.