सोलापूर : सोलापूर – अक्कलकोट रस्त्यावरील मल्लिकार्जुन नगराजवळ एका भरधाव ट्रकने रस्त्यावर भाजीपाला विकणाऱ्या व्यक्तींना जोरदार धडक दिल्यामुळे दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर अन्य तिघे जण जखमी झाले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अपघातातील जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यात उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाला. मोहसीन मेहबूब पठाण (वय 35, रा भुलाभाई चौक, रविवार पेठ), जुलेखा मुर्तूज शेख (वय 55, रा पडगाजी नगर, अक्कलकोट रोड) असे दोघा मृतांची नावे असून हे भाजी विक्रेते आहेत. मयत स्थानिक रहिवासी असल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले.
हा अपघात आज शुक्रवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास झाला. अपघातातील जखमींना उपचारासाठी तसेच मृतदेह सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अपघातानंतर अपघातग्रस्त ट्रकमुळे या मार्गावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली असून, पोलिस प्रशासनाकडून क्रेनच्या साह्याने अपघातग्रस्त ट्रक बाजूला घेण्याचे काम सुरू होते.