सांगली : ७६ टक्के अपंगत्व असूनही दुर्धर आजाराने रुपालीचे आधारकार्ड निघत नाही. त्यामुळे दिव्यांग रुपाली आधारकार्डविना शासकीय योजनेपासून २७ वर्षे वंचित होती. मात्र अनेकांच्या सहकार्यामुळे जागतिक अपंगदिनादिवशी तिला आधारकार्ड मिळाले. अनेक वर्षापासून आधारकार्डविना होणारी गैरसोय आणि ते मिळणार म्हटल्यावरचा भाव तिच्या चेहऱ्यावर दिसला.
रुपाली चे मूळ गाव मसूद माले ( ता. पन्हाळा जि. कोल्हापूर ) हे असून तिचे वडील भगवान सोळशे हे ४५ वर्षापासून मामाचे गावी म्हणजे पाडळी येथे आश्रयास आले आहेत.
२७ वर्षीय दिव्यांग रुपाली भगवान सोळसे ही जन्मताच सेरेब्रल पाल्सी व मतिमंद या आजाराने ग्रस्त आहे. तिची उंची फक्त दोन फूट आहे. सांगली , कोल्हापूर , सातारा जिल्ह्यातील अनेक ठिकाणी आधारकार्ड काढण्यासाठी प्रयत्न केले मात्र त्यात यश आले नाही. आधारकार्ड नसल्याने शासनाच्या सवलतीपासून वंचित राहावे लागत होते. मतदार यादीत नाव आहे मात्र आवश्यक कोणतेही ओळखपत्र नसल्याने मतदानापासूनही वंचित राहावे लागत होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
३ डिसेंबर जागतिक अपंग दिना दिवशी पत्रकार विकास शहा , तहसीलदार गणेश शिंदे , शिक्षक महादेव देसाई , अब्बास मुरसल ,सलवा मुल्ला , परवीन नालबंद , सरपंच सत्यवान पाटील , जिल्हा समन्वयक संदीप पाटील यांच्या प्रयत्नाने यश आले. डोळ्याचे तसेच हाताचे स्कॅनिंग करण्यासाठी जवळपास दोन तास लागले.
यावेळी आधारकार्ड काढण्यासाठी उपस्थित असणाऱ्या अनेक नागरिकांनी या मुलीची अवस्था पाहून थांबून सहकार्य केले. रूपालीच्या डोळ्याचे व हाताचे स्कॅनिंग करण्यासाठी पत्रकार विकास शहा , महादेव देसाई आदी पाच – सहा जणांना खूप कष्ट घ्यावे लागले. ज्यावेळी ही प्रक्रिया पूर्ण झाली, त्यावेळी रूपालीच्या आई वडिलांच्या डोळ्यात अश्रू आले. यावेळी मदत करणाऱ्या सर्वांचा शिक्षक महादेव देसाई यांनी फुले देऊन सत्कार केला.