पुणे : यंदाचा संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा अर्थातच कार्तिकी वारीतील कार्यक्रम मर्यादित वारकर्यांच्या उपस्थितीत पार पाडावेत असा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जारी केला आहे. यात्रा दरम्यान इंद्रायणी नदीत स्नान करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
विशेष म्हणजे आळंदीत भाविकांची गर्दी टाळण्यासाठी तीर्थक्षेत्र पंढरपूरप्रमाणे संचारबंदीचा मार्ग प्रशासन अवलंबणार आहे. खबरदारी म्हणून आळंदीसह आसपासच्या अकरा गावांत 15 डिसेंबरपर्यंत संचारबंदी लागू करण्यात येणार आहे.यात्रा कालावधीत आळंदीकडे येणारी खाजगी तसेच सरकारी प्रवाशी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. तर शहरातील धर्मशाळेत वारीपूर्वी आणि वारीकाळात वारकरी आणि इतर मनुष्यास निवासास प्रतिबंध केला आहे.
आळंदीत संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त 8 डिसेंबरपासून भरणार आहे. पंढरपुरातून कार्तिकीवारीसाठी श्री पांडुरंग, संत नामदेवराय, संत पुंडलिकराय या मानाच्या तीन दिंड्यांना राज्य शासनाकडून प्रत्येकी वीस वारकर्यांना आळंदीत प्रवेशासाठी परवानगी दिली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या तिन्ही दिंड्या 8 डिसेंबरला एसटीने आळंदीत दाखल होणार आहेत. संचारबंदी काळात केवळ मंदिरात देवस्थानचे नैम्मित्तक कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली आहे. वारीकाळात कीर्तन, जागर, माऊलींच्या समाधीवरील नित्योपचार पूजा करण्यास अटी – शर्ती घालून परवानगी देण्यात आली आहे. तर यात्रा दरम्यान इंद्रायणी नदीत स्नान करण्यास बंदी घालण्यात आली आहे. माउलींच्या महाद्वारातील गुरू हैबताबाबा पायरीपूजन परंपरेप्रमाणे होणार आहे. मात्र या पूजेला फक्त 50 जणांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.
* उद्या रविवारपासून अंमलबजावणी
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी यंदा संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा अर्थातच कार्तिकी वारीतील प्रमुख कार्यक्रम मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पाडण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिला आहे. यापार्श्वभूमीवर उद्यापासून आळंदीसह चऱ्होली खुर्द, केळगाव, डूडूळगाव, चिंबळी, वडगाव -घेनंद, कोयाळी, धानोरे, सोळू, मरकळ, चऱ्होली बुद्रुक अशा दहा गावांत सोहळा समाप्तीपर्यंत अर्थातच १५ डिसेंबरपर्यंत संचारबंदी लागू करण्यात येणार आहे.
आळंदी शहरात तसेच माऊली मंदिराच्या प्रवेशद्वारात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. मंदिराकडे येणाऱ्यामार्गावर, प्रदक्षिणा रस्ता, शहर प्रवेश करणारे रस्तेही बंद केले जाणार आहेत. पुण्याहून आळंदीकडे येणाऱ्या मॅक्झीन फाटा, डुडुळगाव, चिंबळी फाटा, चाकण रस्ता, वडगाव रस्ता, मरकळ रस्ता प्रवासास पूर्ण बंद राहणार आहे.