मुंबई : शेतकरी आंदोलनांची केंद्र सरकारने दखल न घेतल्यास हे आंदोलन केवळ दिल्लीपुरत मर्यादित राहणार नाही, असा सूचक इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे.
केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीत पंजाब, हरियाणासह देशातील इतर भागातील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. दिल्लीच्या सीमेवर हजारो संख्येनं शेतकरी दाखल झाले आहेत. यावरूनच शरद पवारांनी केंद्र सरकारला फटकारले आहे. शरद पवारांच्या या वक्तव्याला चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं असून काहीही झालं तरीही कायदा रद्द होणार नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मोदी सरकारने सर्वसामान्य शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून हा कायदा तयार केला आहे. या कायद्याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना होणार आहे. त्यामुळं काहीही झालं तरीही कायदा रद्द होणार नाही. या कायद्यात बदल केला जाईल, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
केंद्रानं केलेल्या कायद्यात कोणताही बदल केला नाही. जे जुन्या कायद्यात होते , तेच कायम आहे. फक्त या कायद्याने शेतकऱ्यांना मार्केटच्या बाहेर माल विकण्याची परवानगी मिळाली आहे. प्रश्न फक्त एमएसपीचा होता. केंद्र सरकार लिखित स्वरुपात एमएसपीची रक्कम लिहून द्यायला तयार आहे. तरीही आंदोलनं आणि भारत बंद करणं याला काही अर्थ नाही, असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारने केलेला कायदा रद्द होणार नसल्याचा पुर्नउच्चार केला आहे.