मुंबई : आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याचा निर्णय शिवसेनेच्या मंत्री आणि आमदारांच्या बैठकीत घेण्यात आल्याचं खात्रीलायक सूत्राकडून सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे नेत्यांनी निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश देखील मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
होऊ घातलेल्या महानगरपालिका, नगरपालिका त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली एकत्र लढवण्याचा निर्णय काल (बुधवारी) शिवसेनेच्या बैठकीत घेण्यात आला. आगामी महापालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांचा आदेशानुसार याबाबत निर्णय घेतला जाईल, असं शिवसेना नेते आणि महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितलं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
राज्यमंत्री अब्दुव सत्ता यांनी सांगितलं की, शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीला शिवसेनेचे मंत्री, पदाधिकारी उपस्थित होते. कोरोना संसर्गामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं घेतलेला निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
दरम्यान, नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघात झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीनं जोरदार मुसंडी मारली. 6 पैकी 5 जागांवर महाविकास आघाडीनं विजय संपादन केला. त्यामुळे शिवसेनेनं आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली एकत्र लढणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
“आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकांसाठी शिवसेनेची रणनीतीवर खलबतं सुरू असून याबाबत अंतिम निर्णय उद्धव ठाकरे घेतील”
अब्दुल सत्तार – शिवसेना नेते