नवी दिल्ली : शदर पवार हे देशाच्या राजकारणात नाव घेतल्याशिवाय देशाचे राजकारण पूर्ण होत नाही. तसेच एक न झाले पंतप्रधान अशीही पवारांची ख्याती आहे. अशात त्यांच्या दोन दिवसावर येऊन ठेपलेल्या वाढदिवसाच्या तोंडावर परत एकदा शरद पवारांच्या पंतप्रधानाच्या उमेदवारीसह यूपीएच्या अध्यक्ष पदाची चर्चा सुरु झाली आहे.
महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी एकत्र आलेल्या शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी या भिन्न विचारसरणीच्या पक्षांचं वर्षभरात चांगलंच गूळपीठ जमल्याचं पाहायला मिळालं. ठाकरे सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त तिन्ही पक्षांनी पाचच नव्हे, तर पंचवीस वर्ष सत्तेत एकत्र राहण्याचा मानस बोलून दाखवला.
त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय स्तरावरही अशाच प्रकारे विरोधी पक्षांशी मोट बांधली जावी, यासाठी काँग्रेसने गळ घातली आहे. विशेष म्हणजे शरद पवारांना पंतप्रधानपदाचा उमेदवार करण्याचीही त्यांची तयारी आहे.
शरद पवार यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रासारखी महाविकास आघाडी केंद्रीय स्तरावर करण्याची मागणी केली जात आहे. काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी या संबंधीचा प्रस्ताव शरद पवार यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विरोधी पक्षाला एकत्र करुन आगामी लोकसभा निवडणुकीचं नेतृत्व करावं, असा प्रस्ताव काँग्रेसने दिला आहे.
शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कृषी कायदा रद्द करण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर शरद पवार यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करण्याची तयारीही काँग्रेससह अनेक विरोधी पक्ष करत आहेत, अशी माहिती विरोधीपक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिली. विरोधी पक्षांचे नेते अमेरिकेतील जो बायडन थेरपी भारतात लागू करण्याची तयारी करत आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पुढील लोकसभा निवडणुका 2023 मध्ये होणार आहेत. म्हणजेच साडेतीन वर्षांचा अवकाश आहे. साधारण सहा महिने ते एक वर्ष आधीपासून निवडणुकांची मोर्चेबांधणी सुरु होते. मात्र गेली सहा वर्ष सत्तेपासून दूर राहिलेली काँग्रेस आतापासूनच तयारीला लागलेली दिसते. पुढील लोकसभा निवडणुकांमध्ये राहुल गांधी यांना थेट पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरवण्याऐवजी शरद पवार यांच्यासारखा अनुभवी चेहरा देण्याचा काँग्रेसचा प्लान दिसत आहे. शरद पवार यांच्याकडे असलेले नेतृत्वगुण, दांडगा अनुभव, विरोधी पक्षांची मोट बांधण्याची क्षमता याचा फायदा करुन घेण्याचा काँग्रेसचा इरादा असावा.
काँग्रेस पक्षाच्या सध्याच्या अध्यक्षा सोनिया गांधी या लवकरंच रिटायरमेंट घेण्याची शक्यता आहे. सोनिया गांधी यांच्यानंतर येत्या काळात शरद पवार यांच्याकडे युपीएचं अध्यक्षपद जाण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनिया गांधी यांच्यानंतर काँग्रेसचं नेतृत्व कोण स्विकारणार? यावर पक्षांतर्गत धुसपूस चालू आहे. या मुद्द्यावरून पक्षांतर्गत अनेक नेत्यांमध्ये वाद चालू असल्याचं देखील समोर आलं होतं. मात्र, आता काँग्रेस आणि यूपीएचं अध्यक्षपद शरद पवार स्विकारतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. काँग्रेस आणि यूपीएच्या अध्यक्ष पदासाठी राहुल गांधी यांनी नकार दिल्यानंतर आता शरद पवारांचं नाव या पदासाठी पुढे आलं आहे.
* शिवसेनेकडूनही पवारांचे नेतृत्व मान्य
सध्या शेतकरी आंदोलनामुळे देशभरात राजकीय वातावरण तापलं आहे. अशातच दिल्ली मध्ये अनेक राजकीय घडामोडी होऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची युपीएच्या अध्यक्षपदी निवड होण्याचं वृत्त सगळीकडे पसरलं आहे.
यूपीए अध्यक्षपदासाठी शरद पवार यांच्या नावाची चर्चा सुरू असून त्यावर आपले काय मत आहे, असे शिवसेना नेते संजय राऊतांना विचारले असता असा काही निर्णय झाल्यावरच मी मत व्यक्त करेन, असे राऊत म्हणाले. त्याचवेळी राऊत यांनी पवारांच्या नेतृत्वाची तोंडभरून स्तुती केली. शरद पवार हे देशातील एक प्रमुख नेते आहेत. राष्ट्राचे नेतृत्व करण्याची संपूर्ण क्षमता पवार यांच्यात आहे. दांडगा अनुभव, देशाच्या प्रश्नांची जाण आणि खंबीरपणा या सर्वच गोष्टी पवार यांच्याकडे आहेत, असे राऊत म्हणाले.
‘राष्ट्राचे नेतृत्व करण्याची संपूर्ण क्षमता सध्या कोणामध्ये असेल तर ती शरद पवार साहेबांमध्ये आहे.’ असं विधान संजय राऊत यांनी केलं आहे. यासोबतच, ‘भविष्यात राष्ट्रीय राजकारणात काय होईल हे मी सांगू शकत नाही. मात्र, देशभरातील विरोधकांची इच्छा आहे महाराष्ट्रातील प्रयोग भविष्यात देशपातळीवर करावे’ असं सूचक वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.