मुंबई : राज्यात केवळ आठ दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा राहिल्याने राजकीय पक्षांकडून रक्तदान शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे. शिवसेनेने रक्तदात्यांना रक्तदान शिबिरात खेचून आणण्यासाठी अभिनव शक्कल लढवली आहे.
रक्तदान करा आणि एक किलो चिकन किंवा एक किलो पापलेट किंवा पनीर घेऊन जा, अशी ऑफरच शिवसेनेने दिल्याने त्याची जोरदार चर्चा होत आहे.
मुंबईतील ब्लड बँकेत रक्ताचा तुटवडा असल्याने मुलुंडमध्येही शिवसेनेच्या वतीने महारक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी इथेही रक्तदात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी 1 किलो पापलेट मासे, 1 किलो चिकन आणि शाकाहारी रक्तदात्यांना 1 किलो पनीर भेट देण्यात येत आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कोरोना संकटामुळे मुंबईसह राज्यातील रक्तसाठा कमी झाल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रक्तदान करण्याचं आवाहन केलं होतं. दोन दिवसांपूर्वी राज्याचे आरोग्य राजेश टोपे यांनीही राज्यात सहा दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा असल्याचं सांगून रक्तदान करण्याचं आवाहन केलं होतं.
त्यानुसार शिवसेनेने माहिम, दादर, वरळी आणि प्रभादेवी परिसरात रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं. मात्र, या शिबिरातून रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना एक किलो चिकन आणि एक किलो मटर पनीर देण्याची ऑफर देण्यात आली आहे. तसे पोस्टर आणि बॅनर्सही या परिसरात लावण्यात आले आहेत. त्यामुळे या ऑफरची परिसरात चर्चा रंगली. दरम्यान, अनेक रक्तदात्यांनी या ऑफरचा लाभ न घेता स्वखुशीने रक्तदान केल्याचं आमदार सदा सरवणकर आणि नगरसेवक समाधान सरवणकर यांनी सांगितलं. या दोघांच्या प्रयत्नातून हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं.