लखनौ : उत्तर प्रदेशातील हाथरस हे नुकतेच एका अत्याचारित घटनेने गाजले. आता आणखी एका बातमीने हाथरस नाव चर्चेत आले आहे. हाथरसमध्ये धक्कादायक बाब समोर आली आहे. तेथील कारखान्यामध्ये मसाल्यांमध्ये गाढवाची विष्ठा, गवत आणि अन्य घातक पदार्थ मिसळले जात असल्याचे उघड झाले आहे. विविध नामांकित कंपन्यांच्या पॅकेटमध्ये हे मसाले भरून विक्री केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.
अधिक नफा कमावण्यासाठी अन्नपदार्थांमध्ये भेसळ करण्याचे प्रकार अनेकदा समोर आले होते. ग्राहकांच्या आरोग्याचा विचार न करता सर्रास ही अन्नपदार्थांमध्ये भेसळ करण्यात येते. मसाले तयार करणाऱ्या कारखान्यात भेसळ होत असल्याची घटना समोर आली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
हाथरस पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी छापा टाकला. हाथरस परिसरातील नवीपूर येथे या कारखान्यावर सह न्यायदंडाधिकाऱ्यांसह एफडीएच्या पथकाने छापा टाकला.
त्यानंतर येथून मोठ्या प्रमाणात बनावट मसालेही जप्त करण्यात आले. हा कारखाना अनूप वार्ष्णेय यांच्या मालकीचा आहे. यावेळी तेदेखील त्याच ठिकाणी उपस्थित होते. टाईम्स ऑफ इंडियानं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. या छाप्यात तब्बल ३०० किलो भेसळयुक्त मसाले जप्त करण्यात आल्याची माहिती संयुक्त दंडाधिकारी प्रेम प्रकाश मीणा यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना दिली. तसंच छाप्यादरम्यान भेसळीसाठी वापरली जाणारी सामग्री म्हणजेच गाढवाची विष्ठा, गवत, रंग आणि अॅसिड सापडलं असल्याचंही त्यांनी सांगितलं.
* कारखाना केला सील
संयुक्त दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कारखाना सील करण्यात आला आहे. तसंच कारखान्याच्या चालवणाऱ्या व्यक्तीला अटकही करण्यात आली आहे. मसाल्यांच्या चाचणीसाठी २७ हून अधिक नमूने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून अहवाल मिळाल्यानंतर अन्न सुरक्षा अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात येणार असल्याचं मीणा यांनी सांगितलं.
* कारखान्याकडे कोणतीही कागदपत्रे नाहीत
स्थानिक नामांकित मसाल्यांच्या कंपन्यांच्या नावाचे ३०० किलो मसाले या कारखान्यातून जप्त करण्यात आले आहेत. कारवाईच्या दरम्यान भेसळयुक्त मसाले तयार करण्याची सामग्री यावेळी तेथे आढळून आली. ज्यामध्ये गाढवाची विष्ठा, गवत, भुसा आणि अॅसिडने भरलेले रंग या ठिकाणी आढळून आले अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, नामांकित मसाल्यांच्या कंपन्यांची १००० रिकामी तर १०० भरलेली पाकिटं या कारखान्यामध्ये आढळून आली. कारखान्याता मालक अनूप याच्याकडे या कंपन्यांच्या परवान्यांसंदर्भात विचारणा केली असता कोणतीही कागदपत्रे त्याला सादर करता आली नाही.