ठाणे : ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवाला धोका होण्यासाठी अघोरी प्रथेचा वापर करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. जादुटोणा करणाऱ्या दोघांना बोईसर स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. कृष्णा बाळू कुरकुटे आणि संतोष मगरु वारडी असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
विक्रमगड तालुक्यातील जव्हार पोलीस स्टेशन हद्दीतील कऱ्हे तलावली येथील एका घरात तांदळामध्ये पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो ठेवून अलौकिक शक्तीची कृपा मिळवण्याच्या हेतूने त्यांचा जीवाला धोका व्हावा अथवा त्यांच्या शरीराला जीवघेण्या जखमा होवून दुखापत करण्याकरिता अनिष्ठ अघोरी प्रथांचा वापर केला जात होता.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अघोरी पूजा करणाऱ्यांकडून एकनाथ शिंदे यांच्या फोटो समोर अगरबत्ती पेटवून हळद, कुंकू, काळा बुक्का, लिंबू, सफेद कोंबडा यांचा वापर करुन अघोरी जादूटोणा करण्यात येत होता. याप्रकरणी पालघर उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली बोईसर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विक्रमगड विक्रमगड तालुक्यातील आणि जव्हार पोलीस स्टेशन हद्दीतील कऱ्हे तलावली येथून दोघांना रंगेहाथ अटक केली.
जव्हार पोलीस स्टेशनमध्ये या आरोपींविरोधात भांदवि कलम 420, 34 फसवणूक आणि महाराष्ट्र नरबळी,अमानुष अनिष्ठ अघोरी प्रथा, जादूटोणा प्रतिबंध अधिनियम 2013 च्या कलम 2(1) (ख), (2) (3), 3 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार कोण, याचा तपास आता पोलीस करत आहेत.