सोलापूर : अनेकांचा जीव घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याला अखेर ठार करण्यात आज शुक्रवारी यश आले आहे. या बिबट्याला गोळ्या घालून ठार करण्यासाठी मुख्य प्रधान वनसंरक्षकांनी परवानगी दिली होती.नरभक्षक बिबट्यामुळे करमाळा, माढा तालुक्यात दहशतीचे वातावरण होते.
शंभराहून अधिक बंदुकधारी कर्मचारी त्याच्या मागावर होते. अखेर आज शुक्रवारी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या दरम्यान नरभक्षक बिबट्याला ठार करण्यात आले आहे. वांगी क्र. चार येथील राखुंडे यांच्या केळीच्या बागेत बिबट्याला गोळ्या घालून ठार करण्यात आले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
बीड, नगरमार्गे सोलापुरातील करमाळा तालुक्यात आलेल्या नरभक्षक बिबट्याने अनेकांचा जीव घेतला होता. करमाळासह माढा तालुक्यातही दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्याला ठार मारण्यात आल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:स्वास सोडला.
या बिबट्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले होते. बिबट्याला ठार मारण्याच्या दृष्टीने आमदार संजय शिंदे, माजी आमदार नारायण पाटील यांनीही बिबट्याला पकडण्यासाठी व ठार करण्यासाठी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला होता. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनीही अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. आज नरभक्षक बिबट्याला ठार करण्यात यश मिळाले.
वन विभागाचे उपवनसंरक्षक धैर्यशिल पाटील यांनी मृत बिबट्याला ताब्यात घेतले आहे. मृत बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी जमा झाली आहे. त्यामुळे वन विभागाचे कर्मचारी बिबट्याला घेऊन सोलापुरकडे रवाना झाले आहेत. सोलापुरात बिबट्याचे शवविच्छेदन होईल, अशी माहिती वनविभागाकडून पाटील यांनी सांगितले.