सोलापूर : भारतीय जनता पार्टीला एक झटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते कल्याणराव काळे हे लवकरच हातावर राष्ट्रवादीचे घड्याळ बांधणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि कल्याणराव काळे हे सरकोली येथे आज शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात एकाच मंचावर उपस्थित होते. भाजपाचे नेते कल्याणराव काळेंना एनसीपीचा लळा लागला असून शरद पवारांचे नेतृत्व मान्य करण्याची भाषा त्यांनी केलीय.
शरद पवार आणि कल्याणराव काळे उपस्थित असलेल्या कार्यक्रमात कल्याणराव काळे यांनी केलेले वक्तव्य चांगलेच गाजले असून, त्या वक्तव्याची चर्चा देखील मोठ्या प्रमाणे होऊ लागली आहे. २०१४ मध्ये काँग्रेसकडून निवडणूक लढवून कल्याणराव काळे यांनी ६५ हजार मते मिळवली होती. ऐन लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर कल्याणराव काळें यांनी भाजपात प्रवेश केल्याने माढ्यासारख्या बालेकिल्ल्यातच काँग्रेस-राष्ट्रवादीला खिंडार पडले होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आपण यापुढे शरद पवार साहेब जे सांगतील त्या पध्दतीने काम करू, असे कल्याणराव काळे यांनी म्हटले आहे. त्यामुळे कल्याणराव काळे पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.
पुढे कल्याणराव काळे म्हणाले, पवार साहेबांच्या मदतीमुळेच आज साखर कारखान्याचे धुराडे पेटले आहे. मध्यंतरी आमच्या हातून पण काही चुका झाल्या आहेत, मात्र पवार साहेबांनी कधीच दुजाभाव केला नाही. शेतकऱ्यांची कारखानदारी नीट चालावी, अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे आज पंढरपुरातील विठ्ठल ,चंद्रभागा आणि भीमा हे कारखाने सुरू झाले आहेत. त्यामुळे आपण यापुढे शरद पवारांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे देखील कल्याणराव काळे यांनी म्हटले आहे.