नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील हाथरसमध्ये एका दलित तरुणीवर अत्याचार करण्यात आले होते. आरोपींनी क्रूरतेची परिसीमा पार केली होती. तरुणीवर सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली होती. आता याप्रकरणी सीबीआयने चार आरोपींना दोषी ठरवत त्यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे. यात बलात्कार आणि हत्या केल्याचे म्हटलं आहे.
या प्रकरणावरुन संपूर्ण देशातून हळहळ व्यक्त करण्यात येत होती. याप्रकरणाचा तपास काही दिवसांपूर्वी सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. आता याप्रकरणी सीबीआयने चार आरोपींना दोषी ठरवत त्यांच्या विरोधात चार्जशीट दाखल केली आहे. चार्जशीटमध्ये तरुणीसोबत सामूहिक बलात्कार करुन त्यानंतर तिची हत्या करण्यात आल्याचं सांगितलं आहे. काल शुक्रवारी सीबीआयच्या वतीनं दोन हजार पानांहून अधिक पानांची चार्जशीट दाखल केली. आता संपूर्ण देशभरात चर्चिल्या गेलेल्या हाथरस प्रकरणी 4 जानेवारी 2021 रोजी सुनावणी पार पडणार आहे.
दरम्यान, हाथरस प्रकरणानंतर योगी सरकारवर काँग्रेसने टीकेची झोड उठवली होती. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हाथरस पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठीही पोहोचले होते. परंतु, पहिल्यांदा त्यांना भेटू दिलं नाही. त्यावेळी त्या दोघांनाही रस्त्यातच अडवून उत्तर प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.
उत्तर प्रदेशातील हाथरस केसमध्ये 19 वर्षीय एका दलित तरुणीवर पाशवी अत्याचार करण्यात आले. आरोपींनी क्रूरतेची परिसीमा गाठत तरुणीची जीभ कापली. आता याप्रकरणी सीबीआयने चारही आरोपींविरोधात शुक्रवारी आरोपपत्र दाखल केलं आहे. आरोपींच्या वकीलांनी दिलेल्या माहितीनुसार, सीबीआयने संदीप, लवकुश, रवी आणि रामू यांच्या विरोधात गँगरेप आणि हत्येचा आरोप लावला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
14 सप्टेंबर रोजी हाथरसमध्ये एका 19 वर्षीय तरुणीवर पाशवी अत्याचार करण्यात आले. त्यानंतर तिने 29 सप्टेंबर रोजी दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला होता. त्यानंतर 30 सप्टेंबरला रात्री पीडितेचं अंत्यसंस्कार तिच्या परिवाराचं म्हणणं न ऐकता पोलिसांनीच केले.
दरम्यान, स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, “अंत्यसंस्कार कुटुंबियांच्या इच्छेनुसारचं करण्यात आले आहेत.” अधिकाऱ्यांनी पुढे बोलताना सांगितलं की, तपास यंत्रणांनी आरोपींच्या भूमिकेवर लक्ष केंद्रीत केलं आहे. जे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांनी सांगितलं की, गुजरातच्या गांधीनंगर येथील प्रयोगशाळेत आरोपींच्या विविध फॉरेन्सिक चाचण्याही करण्यात आल्या आहेत.
सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी जवाहरलाल नेहरु मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाच्या डॉक्टरांचीही भेट घेतली होती. अत्याचारानंतर पीडितेला याच रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. याप्रकरणी उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारवर देशभरातून मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली होती. त्यानंतर, हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं होतं.
प्रियंका गांधी यांनी ट्विटरवर लिहिलं आहे की, “एकीकडे अन्याय होता, तर दुसरीकडे कुटुंबियांना न्यायाची अपेक्षा होती. पीडितेच्या पार्थिवावर जबरदस्तीनं अंत्यसंस्कार करण्यात आले. पीडितेला बदनाम करण्याचे प्रयत्नही झाले. कुटुंबियांना धमकावण्यात आलं. परंतु, शेवटी सत्याचाच विजय झाला. सत्यमेव जयते.”