माढा : करमाळा तालुक्यात बिबट्याला मारल्यानंतरही संपूर्ण दहशत संपलेली नसतानाच काल रविवारी सायंकाळी माढा तालुक्यातील उंदरगाव हद्दीत बिबट्या दिसल्याचे शेतकऱ्याने नी सांगितल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
माढा तालुक्यातील सीना नदीकाठच्या उंदरगाव येथून उपळाई खुर्द कडे जाणारा जुना रस्ता आहे. या रस्त्यानजीक उंदरगाव हद्दीतच बंडू पारडे नामक शेतकऱ्याची शेती आहे.त्यांच्या उसाची तोड सुरू असताना सायंकाळी साडेसहाच्या सुमारास त्यांच्यासह त्यांची पत्नी व ऊसतोड करणा-या दहा – बारा कामगारांनी बिबट्या पाहिला.
ट्रक्टरच्या लाईटच्या उजेडात स्पष्टपणे बिबट्या पाहिल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. बिबट्याला पाहताच सर्वजण पळाले. तातडीने त्यांनी कुर्मदास साखर कारखान्याचे संचालक दादासाहेब साठे यांना फोनद्वारे माहिती दिली. यामुळे एकुणच या घटनेमुळे उंदरगाव उपळाईसह माढा, मानेगाव परिसरात दहशत पसरली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
परिसरातील शेतक-यांनी कुर्मदास सहकारी साखर कारखान्याचे संचालक दादासाहेब साठे यांनी फोनद्वारे वनविभागाशी व पोलीस स्टेशनशी संपर्क केला आहे. यानंतर पोलीस स्टेशन चे सहा पो निरीक्षक अमुल कादबाने यांच्याशी संपर्क केल्यानंतर याची खातरजमा सुरू असल्याचे सांगितले.
वनपरिक्षेत्र अधिकारी विजय भाटे यांच्याशी संपर्क केला असता याविषयी अधिकारी कर्मचारी यांना पाठवून माहिती घेण्याचे काम चालू असल्याचे सांगितले. एकूणच जिल्ह्यातील बिबट्यांची दहशत कायम असतानाच बिबट्याने माढा तालुक्यात प्रवेश केल्याच्या चर्चेने पुन्हा दहशत वाढली असून तातडीने यावरती वनविभागाने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
२६ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.४५ वाजता बिटरगाव येथे रामा रोडगे यांच्या केळीच्या बागेजवळ शोभा सरडे व रामा रोडगे यांना तो वावरत असताना दिसून आला. त्यापूर्वी सकाळी वांगी नं. १ येथे गॅस गोडावूनमधून गॅस टाक्या वाटप करणारऱ्या कामगारास त्याने दर्शन दिले. एक बिबट्या मारल्यानंतर दुसरा बिबट्या वारंवार वांगी नं. १ व बिटरगाव शिवारात दिसून येत असल्याने शेतकरी दहशतीखाली वावरत आहेत. शेतीची कामे पुन्हा ठप्प होण्याच्या मार्गावर आहेत. शेतात पिकांना पाणी द्यायला व खुरपणी करायला शेतकरी चार ते पाच जणांच्या टोळीने जात आहेत तर जनावरांच्या गोठ्याला रात्रभर राखण करावे लागत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
* मादी बिबट्या शरीराने जाडजूड
वांगी नं. १ व बिटरगाव येथे दिसून आलेला बिबट्या मारला गेला. तो नरभक्षक बिबट्यापेक्षा खूपच जाड असल्याचे प्रत्यक्षदर्शी धनाजी देशमुख व रामा रोडगे यांनी सांगितले. ज्या ज्या वेळी तो दिसला त्याने अद्यापपर्यंत तरी कोणत्याही मनुष्य प्राण्यावर हल्ला केलेला नाही. केवळ पशूंवर हल्ला केला आहे. त्यामुळे हल्ला करण्याची वाट कशाला पाहायची, त्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी बिटरगावातून होत आहे.