पुणे : राज्यमंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांचे वडील विठोबा रामा भरणे यांचे काल मंगळवारी ( ता. 29) रात्री अकराच्या सुमारास पुण्याच्या खाजगी रुग्णालयात निधन झाले.
वडिलांच्या निधनाची वार्ता कळताच राज्यमंत्री भरणेंवर दु:खाचा डोंगर कोसळला. भरणे यांच्या आयुष्यात तात्यांचं स्थान फार महत्त्वाचं होतं. त्यांच्या जडणघडणीत तात्यांचा मोठा वाटा राहिला आहे. आपले तात्या आता आपल्यात नाही, ही कल्पना त्यांना असह्य होत होती.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
ते 90 वर्षांचे होते. राज्यमंत्री भरणे यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली. विठोबा भरणे यांच्या पार्थिवावर आज (30 डिसेंबर) दुपारी 12:25 वाजेच्या सुमारास त्यांच्या मुळगावी भरणेवाडी इथे अत्यंत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, दुपारी सव्वा एक वाजेच्या सुमारास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भरणेवाडीत राज्यमंत्री भरणे यांच्या घरी जाऊन विठोबा भरणे यांना आदरांजली वाहिली. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी भरणे कुटुंबांचे सांत्वन केले.
विठोबा भरणे यांच्या अंत्यसंस्कारावेळी इंदापुर तालुक्याबरोबरच पुणे आणि सोलापूर जिल्ह्याच्या विविध भागातून आलेल्या हजारो लोकांनी साश्रुपूर्ण नयनांनी विठोबा भरणे यांना अखेरचा निरोप दिला. यावेळी आमदार राहुल कूल, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, प्रदीप गारटकर, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले. भरणेवाडी नजीक असलेल्या गावातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून विठोबा भरणेंना आदरांजली वाहिली.
“लहानपणापासून आजपर्यंत प्रत्येक यश-अपयशात माझ्या पाठीशी असलेला तात्यांचा आधार अचानक हरपल्याने मन विषण्ण झाले आहे. पितृछत्र हरपल्याने माझ्या जीवनात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न येणारी आहे.”
– दत्तात्रेय भरणे , पालकमंत्री