मुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई (CBSE) बोर्डाच्या परीक्षांच्या तारखांची घोषणा केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी केली आहे. सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा ४ मे २०२१ पासून सुरू होणार आहेत आणि १० जून पर्यंत संपणार आहेत. प्रात्यक्षिक परीक्षा १ मार्चपासून सुरू होणार आहेत.
नववर्षाच्या पूर्वसंध्येला पोखरियाल यांनी ट्विटरद्वारे ही घोषणा केली. विद्यार्थ्यांना आता पुरेसा वेळ मिळाला असल्याने त्यांनी निश्चिंत मनाने आणि पूर्ण क्षमतेने परीक्षांची तयारी करावी, असे आवाहन त्यांनी केले. सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा फेब्रुवारीपर्यंत होणार नाहीत, असे शिक्षणमंत्र्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते. पण त्या मार्च-एप्रिल महिन्यातही होऊ नयेत, अशी अनेक विद्यार्थ्यांची मागणी होती.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
विद्यार्थ्यानी कोणत्याही ताणतणावाशिवाय पूर्ण तयारीनिशी परीक्षा द्याव्यात, असं आवाहन पोखरियाल यांनी केले आहे. दरम्यान, सीबीएसई बोर्डाने अभ्यासक्रम ३० टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. विद्यार्थ्यांच्या या मागणीचा विचार करत बोर्डाने थेट मे महिन्यात परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षांचा निकाल वेळेत निकाल लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही पोखरियाल यांनी सांगितले. १५ जुलै पर्यंत निकाल लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पूर्वी जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात परीक्षा सुरू होऊन त्या मार्चपर्यंत संपायच्या. मात्र २०२० मध्ये कोरोना परिणामामुळे शैक्षणिक वर्ष विलंबाने सुरू झाले परिणामी परीक्षाही थोड्या विलंबाने होणार आहेत.