औरंगाबाद : ग्रामपंचायत निवडणुकांची आज मतमोजणी पार पडत आहे. औरंगाबादच्या पाटोद्यात भास्कर पेरे-पाटलांचं वर्चस्व संपुष्टात आलं आहे. तब्बल २५ वर्षांनी आदर्श गाव असलेल्या पाटोद्यात सत्तांतर झाल्याचं पाहायला मिळत आहे. पेरे पाटलांनी या निवडणुकीतून माघार घेतली होती. त्यांच्या कन्या अनुराधा पेरे- पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या असून त्यांचा पराभव झाला आहे.
गेल्या २५ वर्षांपासून पाटोदा गावात सरपंच म्हणून बाजी मारणारे भास्कररावर पेरे पाटील यांच्या संपूर्ण पॅनलला मात्र यंदाच्या निवडणूकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. राज्यात पाटोद्याला आदर्श गाव म्हणून ओळख मिळवून देणारे भास्करराव पेरे पाटील यांच्या कन्या अनुराधा पेरे यांचाही पराभव झाला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पाटोदा ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा आज निकाल लागला. यामध्ये भास्करराव पेरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाटोद्यात पॅनल उभे केले. भास्करराव पेरे पाटील यांच्या कन्या अनुराधा पेरे पाटील या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. अनुराधा पाटील यांना १८६ मतं मिळाली आहे तर, त्यांच्या विरोधात उभे असलेले दुर्गेश खोकड यांनी २०४ मतं मिळवून विजय मिळवला आहे. भास्करराव पाटील यांच्या पॅनलचा पराभव हा धक्कादायक मानला जात आहे.
भास्करराव पेरे पाटील हे गेली २५ वर्ष पाटोदा ग्रामपंचायतीत सरपंच म्हणून कार्यरत आहे. या काळात पाटोदा गावाचा कायापालट करुन राज्यात आदर्श गाव म्हणून ओळख मिळवून दिली होती.
मात्र, यंदा त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यांच्या कन्या अनुराधा या निवडणुकीत उतरल्या होत्या. मात्र, येथे भास्करराव पेरे यांचं संपूर्ण पॅनलच पराभूत झाले आहे.
पाटोदा गावातील ११ जागांपैकी ८ उमेदवार बिनविरोध निवडणून आले होते. तर, बाकीच्या तीन जागांसाठी निवडणूक झाली होती. मात्र, या तिन्ही जागांवर भास्कर पेरे यांच्या पॅनलचा पराभव झाला असून संपूर्ण ११ जागांवर कपिंद्र पेरे पाटील यांच्या पॅनलनं सत्ता मिळवली आहे.