टेंभुर्णी : उजनी धरणातून शेतीला रब्बी हंगामासाठी आज बुधवारपासून भीमा नदीपात्र, मुख्य कालवा, भीमा- सीना जोड कालवा (बोगदा), सीना- माढा सिंचन योजना ( माढा तालुका), दहिगाव उपसा सिंचन (करमाळा) या योजनेद्वारे चालू वर्षातील पाण्याचे आवर्तन ( रोटेशन) सुरू झाले आहे. लाभक्षेत्रात असलेल्या शेतीला पहिले पाणी मिळणार आहे. कालव्याचे आवर्तन ३० दिवस चालणार असून अंदाजे सहा टीएमसी पाणी वापर होणार आहे.
२०२० च्या पावसाळ्यात सर्वत्र समाधानकारक पाऊस झालेला असल्यामुळे उजनीच्या वरील सर्व धरणे शंभर टक्के भरलेली आहेत. नंतर उजनी धरणात देखील १५ ऑक्टोबर २० पर्यंत १११ टक्के म्हणजेच १२३ टीएमसी पाणीसाठा करण्यात आला. चालू पावसाळ्यात चांगला पाऊस पडल्यामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे उजनीतून 82 टीएमसी अतिरिक्त पाणी वेळोवेळी भीमा नदीत सोडण्यात आले. यामुळे पाण्याची भूजल पातळी ( ग्राउंड वॉटर लेवल) यावर्षी चांगली असल्यामुळे १५ जानेवारी २१ पर्यंत शेतीसाठी धरणातून आवर्तन सोडण्यात आले नाही. आता मागणीनुसार पाण्याचे आवर्तन सुरु केले असल्याचे असे वरिष्ठ पातळीवरून सांगण्यात आले.
१८ जानेवारीला पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली कालवा पाणी वाटप समितीची ऑनलाईन बैठक झाली होती. यामध्ये ठरलेल्या नियोजनाप्रमाणे २० जानेवारीपासून शेतीचे रब्बी आवर्तन सुरू करण्यात आले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यामुळे मुख्य कालवा व डाव्या कालव्यातून माढा, पंढरपूर( उत्तर- पश्चिम भाग) मोहोळ ,उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर तालुक्यातुन पुढे अक्कलकोट पर्यंत तर उजव्या कार्यामधून माळशिरस (पूर्वभाग )पंढरपूर ( पश्चिम दक्षिण भाग ), मंगळवेढा व सांगोला या तालुक्यातील चार लाख एकर क्षेत्राला पाणी मिळणार आहे तर उजव्या कालव्यातून तीन लाख पन्नास हजार एकर क्षेत्राला पाणी मिळणार आहे. नदीपाञातून सोडलेले हे पाणी दहा ते अकरा दिवस राहणार आहे.
सोलापूरला पाणीपुरवठा करणारे चिंचपोकळी व टाकळी बंधारे पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर भीमा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे १७ बंधाऱ्यात पाणी अडवले जाणार आहे. नदीच्या पाण्यामुळे पिण्यासाठी व शेतीसाठी उपयोग होणार आहे. एकूण सहा टीएमसी पाणी वापरण्यात येणार आहे.
करमाळा तालुक्यातील दहीगाव उपसा सिंचन योजना 22 किंवा 23 जानेवारीला चालू होणार असून या योजनेतून करमाळा तालुक्यातील 22 हजार एकर क्षेत्राला पाणी मिळणार आहे ,तसेच या योजनेसाठी अंदाजे एक टीएमसी पर्यंत पाण्याचा वापर होणार आहे.
* उजनी पाणी पातळी
– पाणी पातळी 497.015 मीटर
– एकूण साठा ते 3082.57 दशलक्ष घन मीटर
-119.44 टीएमसी
– उपयुक्त साठा 1579.76 दशलक्ष घनमीटर 55.88 टीएमसी
– टक्केवारी 104 टक्के
– बाष्पीभवन – चार मिलिमीटर