नाशिक : नाशिकच्या भिंतघर येथील कार्यक्रमात बोलताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी ठाकरे सरकारवर टीका केली. याच कार्यक्रमात विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी या भागातील समस्या राज्यपालांना सांगितल्या व त्या सोडवण्यास तुम्ही मदत करावी अशी मागणी केली. मात्र, राज्यपालांनी आपल्या भाषणात हाच धागा पकडत ‘राज्य सरकार नेमकं काय करतंय? झिरवळ सरकारमध्ये असून माझ्याकडे मागणी करतात’. असे टोले त्यांनी सरकारला लगावले.
“मी राज्यपाल नाही. तर राज्याचा सेवक आहे. दान देणाऱ्या दानशुरांमुळेच देश चालतो. अंध विद्यार्थ्यांकडून काम करणाऱ्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांना दैवी देणगी मिळाली आहे. त्यामुळे दृष्टी बाधितांसाठी काम करणाऱ्यांना अभिवादन. शासनात काम करणाऱ्यांना देखील दैवी दृष्टी मिळावी,” असा टोला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी लगावला.
आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गुलाबी गाव भिंतघर या ठिकाणी हजेरी लावली. यावेळी त्यांच्या हस्ते सुरगणा येथे आदिवासी लाभार्थ्यांना वनकट्ट्यांचं वाटप करण्यात आलं. एकूण 11 हजार 137 लाभार्थ्यांना राज्यपालांच्या हस्ते सातबारा प्रदान करण्यात आले. त्यावेळी राज्यपालांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं.
याप्रसंगी विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळही उपस्थित होते. यावेळी झिरवळ यांनी राज्यपालांकडे या भागाची समस्या मांडली. या भागात भरपूर पाऊस पडतो. पण सर्व पाणी समुद्राला वाहून जातं. पाणी अडवण्यासाठी तुम्ही मदत करा. हा भाग समृद्ध होईल, असं झिरवळ म्हणाले.
झिरवळ यांच्या मागणीचा हाच धागा पकडून राज्यपालांनी राज्य सरकारला टोले लगावले. झिरवळ सरकारमध्ये आहेत. पण ते माझ्याकडे मागणी करतात. मग राज्य सरकार काय करतंय? धावपटू कविता राऊतला नोकरी देण्यात आली नाही. क्रीडामंत्री केवळ नोकरी देण्याची भाषा करत आहेत. काहीच करत नाही. मग सरकार नेमकं काय करतंय, असा सवाल राज्यपालांनी केला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि सत्तेत असलेले महाविकास आघाडी यांच्यातील मतभेद सर्वश्रूत आहेत. महाविकास आघाडीतील नेते वेळ मिळेल तिथे कोश्यारी यांच्यावर टीका करत असतात. तर कोश्यारी देखील सरकारच्या कारभारावर टीका करण्यास मागे हटत नाही. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात कोश्यारी यांनी सरकारच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या ठिकाणी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले. सरकारमधील अनेक मंत्री आपल्या मागण्या घेऊन माझ्याकडे येतात. मग सरकार नेमकं करत काय, असा सवाल राज्यपाल कोश्यारी यांनी उपस्थित केला.
* भुजबळांना भाजपमध्ये येण्याची ऑफर
तत्पूर्वी भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सटाणा येथे संत शिरोमणी देवमामलेदार स्मारकाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी राज्यपाल म्हणाले की, माझ्यासाठी सगळेच देवमामलेदार आहेत. त्यामुळे तुम्हा सर्वांना मी प्रथम प्रणाम करतो. भुजबळांनी संपूर्ण बळ लावलं म्हणून हे स्मारक होत आहे. त्यामुळे भुजबळही सर्वपक्षीय होवोत अशी देवमामलेदारांना प्रार्थना करा. जेणेकरून सर्व भांडण संपून जाईल आणि तुम्हाला भरघोस निधी मिळेल, असं सांगत राज्यपालांनी थेट भुजबळांना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली.