परभणी : जिल्ह्यातील एका शेतकऱ्यानं कर्जवसुलीच्या तगाद्याला कंटाळून आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे शेतकऱ्यानं उद्या सकाळी मातीला या असं व्हॉटसअॅप स्टेटस ठेवून आत्महत्या केली आहे. राज्यातील शेतकरी आत्महत्यांचं सत्र काही थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही.
चंद्रकांत धोंडगे असं आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचं नाव आहे. धोंडगे यांच्या आत्महत्येनं तिवठाणा गावामध्ये खळबळ उडाली आहे. परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील तिवठाणा या गावात चंद्रकांत उर्फ मुंजाजी धोंडगे हे शेती करायचे.
त्यांना कर्जाची परतफेड करण्यासाठी वारंवार धमक्या येत होत्या. कर्ज वसुलीच्या तगाद्या कंटाळून चंद्रकांत भगवान धोंडगे यांनी आत्महत्या केली. धोंडगे यांनी आत्महत्या करत असल्याबाबतचं स्टेटस व्हॉटसअॅपवर ठेवले होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* पैश्यांमुळे मला त्रास झाला
माझ्या मुलांचा सांभाळ करावा उद्या सकाळी माती आहे सर्वांनी यावे. चंद्रकांत धोंडगे यांनी आत्महत्येपूर्वी व्हॉट्सअॅपवर ‘आपल्याला पैशासाठी धमक्या येत आहेत म्हणून मी आत्महत्या करत आहे. माझ्या मुलांचा सांभाळ करावा उद्या सकाळी माती आहे सर्वांनी यावे. पैश्यांमुळे मला त्रास झाला आहे.’ असं स्टेटस ठेऊन चंद्रकांत धोंडगे यांनी विषारी औषध प्राशन केले.
चंद्रकांत धोंडगे यांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसची माहिती त्यांचे काका हणमंत धोंडगे यांनां मिळताच त्यांनी शेतात धाव घेतली. हणमंत धोडगे शेतात पोहोचले तेव्हा चंद्रकांत धोंडगे अत्यावस्थ अवस्थेत आढळून आले. हणमंत धोंडगेंनी चंद्रकांत धोंडगे यांना गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयत दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर चंद्रकांत धोंडगे यांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं. चंद्रकांत धोंडगे यांच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.